

खोपोली : प्रतिनिधी
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी ही देशासमोरील गंभीर समस्या बनली आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था अधिकच बिकट होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येतो. या पार्श्वभूमीवर स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रभावी उपाय शोधण्याच्या उद्देशाने ‘मिशन पॉटहोल फ्री इंडिया’ अंतर्गत खोपोली येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील खड्डे भरून त्याची प्रत्यक्ष चाचणी घेण्याचा प्रायोगिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमात ZGSPL–MELIKA चे संचालक अस्लम लोगडे यांनी विकसित केलेल्या विशेष दुरुस्ती साहित्याचा वापर करण्यात आला. सिमेंट काँक्रीट तसेच डांबरी रस्त्यांवरील खड्डे मुसळधार पावसातही प्रभावीपणे भरता येतात याची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. प्रतिकूल हवामानात या उत्पादनाची कार्यक्षमता तपासणे आणि नागरिकांसमोर त्याचे प्रात्यक्षिक सादर करणे हा या प्रयोगामागील मुख्य उद्देश होता.
या उपक्रमासाठी हेल्प फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला. खोपोली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हिरे, उद्योजक अतिक खोत, उद्योजक अश्पाक लोगडे, MELIKA टीम तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला खोपोली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेविका सानिया शेख, प्रतीक्षा रेटरेकर, अश्विनी अत्रे तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी या प्रयोगाचे स्वागत करत सुरक्षित, टिकाऊ आणि खड्डेमुक्त रस्त्यांसाठी अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन मिळणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी हेल्प फाऊंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांनी सांगितले की, रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती होणे ही केवळ विकासाची नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षिततेची गरज आहे. कमी वेळेत, कमी खर्चात आणि प्रतिकूल हवामानातही प्रभावी ठरणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रयोग करण्यात आला असून, त्यातून मिळणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे भविष्यात अधिक व्यापक स्तरावर काम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
रस्ते सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संघटना, उद्योग क्षेत्र आणि नागरिक यांनी संयुक्तपणे पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. स्वदेशी संशोधन आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या बळावर सुरक्षित, खड्डेमुक्त आणि अपघातमुक्त भारत घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचे पाऊल ठरेल, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.



Be First to Comment