
पनवेल, दि. २४ (प्रतिनिधी): तळोजा पोलिसांनी खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या ४४ तासांत छडा लावत गुजरातमधून आरोपीला अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, साक्षीदारांचे जबाब आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै २०२६ रोजी रात्री नितलस गावातील “निशा ट्रान्सपोर्ट” कंपनीच्या वर्कशॉपमध्ये चालक चंदन कपिलमुनी पांडे आणि रमेशकुमार स्वामीनाथ यादव यांच्यात जुन्या वादातून भांडण झाले होते. त्यानंतर २४ जुलै रोजी पहाटे ४.३० ते ५.०० वाजण्याच्या दरम्यान पुन्हा झालेल्या वादात आरोपीने चंदन पांडे यांच्या डोक्यावर अवजड हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक मोहम्मद आलम हनीफुल खान यांच्या फिर्यादीवरून तळोजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान आरोपी गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर सपोनि. निलेश येवले व त्यांच्या पथकाने गुजरातमधील बलसाड रेल्वे स्थानक परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या ४४ तासांत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
आरोपीला पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपासासाठी पोलीस कोठडी मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर निकम, सपोनि. अजय शिंदे, सपोनि. निलेश येवले, सपोनि. सागर शिंगटे, पोउपनि. ज्ञानोबा धुळकुंडे, पोउपनि. सिद्धेश शिंदे तसेच तळोजा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


Be First to Comment