Press "Enter" to skip to content

गव्हाण फाटा – पनवेल मार्गावर भीषण अपघात


सुमारे दोन कोटींचे नुकसान; परदेशातून आयात केलेले विद्युत ट्रक उड्डाणपुलाच्या लोखंडी संरचनेला धडकले

पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः गव्हाण फाटा ते पनवेल मार्गावरील पाडेघर परिसरात एका ट्रेलर चालकाचा उंचीचा अंदाज चुकल्याने भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत ट्रेलरवर वाहतूक करण्यात येत असलेल्या परदेशातून आयात केलेल्या अत्याधुनिक विद्युत ट्रकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात उड्डाणपुलाचा कोणताही भाग कोसळल्यामुळे झालेला नसून, रस्त्यावरील 4.8 मीटर उंचीची मर्यादा लक्षात न घेतल्याने घडला. उड्डाणपुलाच्या बांधकामस्थळी उंचीची मर्यादा स्पष्टपणे दर्शविण्यात आली होती. मात्र, ट्रेलर चालकाने वाहून नेल्या जाणाऱ्या वाहनांच्या उंचीचा योग्य अंदाज न घेताच वाहन पुढे नेल्याने ही दुर्घटना घडली.

ट्रेलरवर ‘सानी’ कंपनीचे परदेशातून आयात केलेले दोन निळ्या रंगाचे विद्युत ट्रक लादलेले होते. उड्डाणपुलाच्या बांधकामस्थळी असलेल्या लोखंडी संरचनेला ट्रेलरवरील पहिल्या ट्रकचा वरचा भाग जोरदार धडकला. या धडकेमुळे पहिल्या ट्रकची संपूर्ण चालक केबिन उखडून मागे सरकली आणि ती दुसऱ्या ट्रकवर आदळली. परिणामी दोन्ही महागड्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने, ट्रक मजबूत सुरक्षा साखळदंडांनी ट्रेलरला बांधलेले असल्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावर कोसळली नाहीत. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. अपघातानंतर जेएनपीटी परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलिस आणि मदत पथकाने क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रेलर रस्त्याच्या बाजूला हलविण्याचे काम हाती घेतले. प्राथमिक तपासात हा अपघात ट्रेलर चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे समोर आले असून, पुढील तपास सुरू आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.