Press "Enter" to skip to content

ठाणे येथील टीसीएस कंपनीतील कर्मचारी

इर्शाळगडप्रबळगड दरम्यान भरकटलेल्या १३ ट्रेकर्सची थरारक सुटका

पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः  इर्शाळगडावरून माची प्रबळगडाच्या दिशेने ट्रेकसाठी निघालेल्या, आणि घनदाट जंगलात भरकटून अडकून पडलेल्या, ठाण्यातील 13 तरुणांची अखेर सुटका करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस आणि स्थानिक बचाव पथकानी शोध मोहीम राबवून सर्व मला सुखरूप बाहेर काढले आहे.

अंधार पडू लागलेला, मोबाईल नेटवर्क जवळपास बंद, खोल दऱ्या, निसरडे कातळ आणि जीवघेण्या वाटांमुळे ट्रेकर्स गंभीर संकटात सापडले. अखेर आपत्कालीन 112 क्रमांकावर मदतीचा कॉल प्राप्त होताच तातडीने बचाव मोहीम हाती घेण्यात आली.

पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट मार्शल-4 वरील नितीन सोनवणे व प्रदीप पोपटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत माची प्रबळ गावातील अनुभवी वाटाडे नवनाथ पारधी, हरिश्चंद्र पारधी व नथुराम पारधी, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे 3 अधिकारी व 7 पोलीस अंमलदार, निसर्ग मित्र संस्था, पनवेलचे सचिन शिंदे, वरद पवार, हेमंत वैद्य व अक्षय देशमुख, तसेच हेल्प फाउंडेशनचे रेस्क्यूअर्स बचाव मोहिमेत सहभागी झाले. रात्र वाढत असताना दाट जंगलातून मार्ग काढणे हे मोठे आव्हान होते. अनेक ठिकाणी एका चुकीच्या पावलाने शेकडो फूट खोल दरीत कोसळण्याचा धोका होता. मात्र बचाव पथकाने स्वतःचा जीव धोक्यात घालत शोधमोहीम सुरू ठेवली.

अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर भरकटलेल्या ट्रेकर्सपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित मार्गाने एकामागोमाग एक खाली आणण्यात यश आले.
या मोहिमेत सुखरूप बचाव करण्यात आलेल्या ट्रेकर्समध्ये आदित्य अशोक विचारे, प्रकाश संतोष सावंत, यतीन कालिया, ऋतुराज सदाशिव पाटील, अंकित मिश्रा, दीपक उत्तम बनकर, अभिषेक जयप्रकाश बहादूरकर, दीपक कुमार राजदेव महतो, अनिकेत दुबे, चेतन शिंदे, राहुल बनकर, प्रशांत पांचोरे आणि रोहित कुमार यांचा समावेश आहे. हे सर्वजण ठाणे येथील टीसीएस कंपनीत कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वेळीच मिळालेल्या मदतीमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या धाडसी संयुक्त बचाव मोहिमेत पनवेल तालुका पोलीस, स्थानिक वाटाडे, निसर्ग मित्र संस्था आणि हेल्प फाउंडेशनच्या रेस्क्यूअर्सनी जीवाची पर्वा न करता काम केल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. अनोळखी ठिकाणी माहीतगार सोबत असल्याशिवाय पावसाळी गिरी भ्रमंती टाळावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.