
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 3 उन्नत महामार्गांचे भूमिपूजन
पुणे : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवार दिनांक 18 जुलै रोजी पुणे-शिरुर उन्नत द्रुतगती महामार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्ग, हडपसर-यवत उन्नत महामार्ग या पुण्यातील 3 उन्नत महामार्गांचे भूमिपूजन संपन्न झाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या 3 महामार्गांचे भूमिपूजन हे पुण्याच्या वाहतुकीची समस्या सोडवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. विशेषतः पुण्याबाहेरील महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक समस्येवर यामुळे कायमस्वरुपी उपाय मिळणार आहे. या तीन रस्ते प्रकल्पांमध्ये प्रथमच बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (BOT) नवीन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ टोलचा महसूल नव्हे तर संबंधित प्रकल्पातून सरकारला अपफ्रंट (Upfront) निधी मिळणार आहे. या नव्या मॉडेलनुसार पहिल्या प्रकल्पातून ₹500 कोटी, दुसऱ्या प्रकल्पातून ₹300 कोटी, तर तिसऱ्या प्रकल्पातून ₹150 कोटी थेट सरकारला प्राप्त होणार आहेत. हा निधी भूसंपादनासाठी मोठा फायदेशीर ठरेल.
पुणे-शिरूर मार्गाची एकूण लांबी 53.4 किमी आहे. यापैकी 35 किलोमीटरचा चौपदरी उन्नत (Elevated) मार्ग उभारण्यात येणार असून, त्याखाली 4 पदरी जमिनीला समांतर सेवा रस्ता असेल. तर तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाची एकूण लांबी 53.20 किमी आहे. यात 26 किमीचा उन्नत मार्ग आहे. तसेच हडपसर ते यवत मार्ग 31 किमी लांबीचा रस्ता असून यात 6 पदरी उन्नत आणि 6 पदरी जमिनीलगत रस्ता असेल, यामुळे प्रवासाचा किमान 50 मिनिटांचा वेळ वाचेल, तसेच इंधनाची बचत होऊन प्रदूषण कमी होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पुणे-शिरूर आणि हडपसर-यवत मार्गाच्या रचनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एलिव्हेटेड रोड आणि त्यावर मेट्रो असे दुहेरी (Double Decker) मॉडेल विकसित करण्यात आले आहे. या रचनेमुळे भविष्यात मेट्रो प्रकल्पाच्या खर्चात तब्बल 40% बचत होणार आहे. या तिन्ही प्रकल्पांसाठी 4 वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला असला, तरी BOT पद्धतीमुळे काम अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुरंदर विमानतळाचे भूसंपादन वेगाने पूर्ण होत असून, याच वर्षी निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. विमानतळ पूर्ण होईपर्यंत आवश्यक रस्ता आणि मेट्रो कनेक्टिव्हिटीही उपलब्ध करून देण्यात येईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, सांडपाणी प्रक्रिया आणि समान पाणीवाटपासाठी दीर्घकालीन नियोजन करण्यात येत आहे. तसेच पुणे हे अभियांत्रिकी, स्टार्टअप आणि डीप टेकचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत असून, नव्या पायाभूत सुविधांमुळे शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.



Be First to Comment