
आळंदी ते पंढरपूर सुमारे २२० किलोमीटरचे अंतर पाच टप्प्यांत धावत पूर्ण करण्याचा संकल्प; ३५ धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग
पनवेल : वारकरी संप्रदायाची परंपरा, श्रद्धा आणि आधुनिक फिटनेस यांचा सुंदर संगम घडवणारा एक अनोखा उपक्रम पनवेलमधील Dawn Athletes या मॅरेथॉन प्रशिक्षण संस्थेने हाती घेतला आहे. संस्थेच्या वतीने आळंदी ते पंढरपूर ही वारी चक्क धावत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून या उपक्रमाला धावपटूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
या धाववारीचे नियोजन करण्यामध्ये पनवेलचे रहिवासी माधव मदरून आणि संजय मोतलिंग तसेच खारघरच्या अश्विनी सोनावणे यांचा विशेष सहभाग आहे. प्रशिक्षक ज्ञानेश्वर तिडके, श्रद्धा, शिस्त, आरोग्य आणि सामाजिक एकात्मता यांचा संदेश देणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
ही धाववारी एकूण पाच टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामध्ये आळंदी ते जेजुरी (६० किमी), जेजुरी ते फलटण (५२ किमी), फलटण ते नातेपुते (४० किमी), नातेपुते ते टप्पा (४७ किमी) आणि टप्पा ते पंढरपूर (२१ किमी) असा प्रवास धावत पूर्ण केला जाणार आहे.
या अनोख्या वारीसाठी पनवेल येथून ११ जुलै २०२६ रोजी प्रस्थान करण्यात आले असून १७ जुलै २०२६ रोजी पंढरपूर येथे वारीचा समारोप होणार आहे. या उपक्रमात Dawn Athletes क्लबचे सुमारे ३५ धावपटू प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात सहभागी झाले आहेत.
फिटनेस, सामाजिक बांधिलकी आणि विठ्ठल भक्ती यांचा संगम घडवणारी ही धाववारी पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब ठरत असून, युवकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा हा उपक्रम विशेष कौतुकास पात्र ठरत आहे.



Be First to Comment