


आमदार विक्रांत पाटील यांनी वृद्धांना दिला आधार, आदिवासी बांधवांना मदतीचा हात
सहयोग वृद्धाश्रमात स्टील थर्मास, आदिवासी व कातकरी बांधवांना छत्री-रेनकोट वाटप; “जनतेची सेवा हाच माझा वाढदिवस” असा दिला संदेश
पनवेल, ता. ६ (प्रतिनिधी) : विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, सत्कार आणि जल्लोषापेक्षा समाजातील गरजू, वंचित आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याला प्राधान्य देत माणुसकीचा आदर्श घालून दिला. देहरंगगाव येथील सहयोग वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच आदिवासी व कातकरी बांधवांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस सामाजिक बांधिलकीच्या भावनेत साजरा करण्यात आला.
या उपक्रमात सहयोग वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना स्टीलचे थर्मास भेट देण्यात आले. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी व कातकरी पाड्यांतील बांधवांना छत्री आणि रेनकोट वाटप करून त्यांच्या दैनंदिन जीवनात छोटासा आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले, तर गरजू कुटुंबांनाही दिलासा मिळाला.
यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी आदिवासी भगिनींशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. आदिवासी समाज हा “जल, जंगल आणि जमिनीचा खरा रक्षक” असून त्यांच्या हक्कांचे संरक्षण, मूलभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि त्यांच्या प्रश्नांच्या तातडीने निराकरणासाठी आपण कायम कटिबद्ध राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कार्यक्रमादरम्यान चिमुकल्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या निरागस हास्याने आणि कलागुणांनी कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. या मुलांमध्येच समाजाचे उज्ज्वल भविष्य दडले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना आमदार विक्रांत पाटील म्हणाले, “राजकारण म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास, विश्वास आणि माणुसकी पोहोचवण्याची जबाबदारी आहे. जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद हेच माझे खरे बळ असून सर्वसामान्यांच्या सेवेसाठी माझी वाटचाल अशीच अविरत सुरू राहील.”
या समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन युवा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अभिषेक देशमुख, रणजित देशमुख, विश्वकांत लोकरे, माणिक पंडित, विकास जाधव, कृष्णा वाघ, शर्मिला वाघ तसेच युवा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.






Be First to Comment