
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा बनेल महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
पनवेल (प्रतिनिधी) देवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास या अनुषंगाने पुढच्या पिढीला रायगडमध्ये वेगवेगळ्या संधी निर्माण होणार आहेत. आणि त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल आणि भ्रष्टाचार रोखायचा असेल तर शेकाप महाविकास आघाडीचा दारुण पराभव करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पनवेल येथे केले.
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने पनवेल, उरण, कर्जत, खालापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, उरणचे उपनगराध्यक्ष रवी भोईर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, उपाध्यक्ष गणेश कडू, प्रल्हाद केणी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, पनवेल उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, खालापूर मंडल अध्यक्ष प्रविण मोरे, आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना पुढे म्हंटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गतिमान सरकार म्हणून काम सुरु आहे, त्यामुळे लोकांचा विश्वास वृद्धिंगत झाला आहे. आणि त्या अनुषंगाने नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीत मोठे यश मिळून महाराष्ट्रातील संपूर्ण वातावरण भाजपमय झाले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांचे व्यक्तीमत्व सोबत घेऊन सर्वाना चालणे आहे त्यामुळे किमान ५१ टक्के मतदानाची लढाई आपण सहज पार करत आलो आहे. विकासामुळे नागरिकांच्या जीवनात चांगले बदल घडते त्यामुळे विकासाच्या योजना आणि प्रकल्प हि काळाची गरज आहे. आणि त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था महत्वाची भूमिका पार पाडते. हि भूमिका योग्यप्रकारे पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता असणे गरजेचे आहे. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्यावर काय होते हे रायगड जिल्ह्याने पाहिले आहे. त्यामुळे याची दक्षता घ्या, असे नमूद करून निवडणूक जिंकण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मार्गदर्शन शक्ती, प्रेमळ आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी व प्रितम म्हात्रे या सर्वांची ताकद शंभर टक्के विजय मिळवून देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तुमची आमची भाजप सर्वांची हे घोषवाक्य घेऊन निवडणुकीला सामोरे जा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची ताकद तुमच्या पाठीशी आहे, असेही प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. रायगड जिल्ह्याच्या भल्यासाठी व्हिजन घेऊन देवाभाऊ आणि सरकार काम करत आहे, त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या विकासाचा दृष्टिकोनातून लक्षात घेता आणि रायगड जिल्हा महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती महत्वाच्या आहेत, असेही त्यांनी अधोरेखित केले.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांमध्ये जनतेने भाजपवर पुन्हा एकदा ठाम विश्वास व्यक्त करत भरघोस कौल दिला आहे. या ऐतिहासिक विजयामुळे राज्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संघटनात्मक ताकदीला जाते, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात केले. पनवेलच्या जनतेने पुन्हा एकदा भाजप महायुतीला भरघोस ताकद देत विकासाच्या मार्गावर आपली निष्ठा अधोरेखित केली आहे. या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पनवेलकरांचे मनापासून आभार मानत हा विजय केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून कार्यकर्त्यांना नवी उमेद, नवी ऊर्जा आणि भविष्यासाठी स्फूर्ती देणारा असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले. भाजपच्या कार्यक्षमतेवर मतदार नागरिकांनी विश्वास ठेवला. देवाभाऊंनी पनवेलच्या विकासाचे व्हिजन मांडले आणि त्यामध्ये विशेषतः रोजगार, संधी, पाणी, रस्ते सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा अधिक भक्कम करण्याचे आश्वासित केले. त्यांच्या आश्वासक कृतीमुळे पनवेलला बळ मिळाले आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

निवडणूक आल्यावर विरोधकांना फक्त राजकारापोटी विशेषतः स्वतःच्या स्वार्थापोटी मतदार आठवतात. विकासावर न बोलता टीका आरोप करणे हा त्यांचा पिंड झाला आहे आणि हाच धागा पकडून आमदार प्रशांत ठाकूर यांनी बाळाराम पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप कोण करतो तर ज्यांनी कर्नाळा बँकेत भ्रष्टाचार करून लोकांना देशोधडीला लावले ते. आणि फोटो बॅनरवर झळकावून राजाचे राजपण कालपण आजपण आणि उद्यापण मग भ्र्रष्टाचारी राजा साडेचार वर्षांपासून तळोजा जेलमध्ये का आहे? असा सवाल उपस्थित करून बाळाराम पाटील यांची हवाच गुल्ल केली. विरोधकांकडून विमानतळाच्या नामकरणाबाबत होत असलेल्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर दिले. ज्यावेळी दिबांच्या नावासाठी लढा उभारला होता त्यावेळी बाळाराम पाटील यांनी जाहीररित्या व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला पसंती देत दिबासाहेबांच्या नावाला जाहीर विरोध केला होता. याचीही आठवण त्यांनी या बैठकीत समस्त पनवेलकरांना करून दिली. या बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी केले. जिल्हा परिषदेत किमान २५ प्लस उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.



Be First to Comment