
पनवेल (प्रतिनिधी) रंगरचना कला मंच नाट्य संस्था, पनवेल यांच्या वतीने आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धेला उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद मिळाला. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रंगभूमीसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर देत असलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल मधील रंगकर्मी तर्फे त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम गुरुवारी पनवेल शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते रामशेठ ठाकूर होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, प्रसिद्ध मुलाखतकार व निवेदक संजय भुस्कुटे, अभिनेते मकरंद पाध्ये, नाट्य लेखक-दिग्दर्शक व अभिनेता निनाद शेट्टी, लेखक व अभिनेते रवी वाडकर, योगार्थी कॉलेज ऑफ इंडिक, ठाणे यांच्या प्राचार्या डॉ. सुषमा काळे तसेच शेल शिक्षण संस्थेचे संस्थापक सुरेश काळे, पत्रकार गणेश कोळी, प्रशांत शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
ही स्पर्धा बालगट आणि खुला गट अशा दोन गटांत घेण्यात आली होती. मुंबई, ठाणे, अलिबाग, रोहा, रसायनी, डोंबिवली, भायखळा आदी ठिकाणांहून स्पर्धकांनी सहभाग घेतला. दोन्ही गटांतील स्पर्धकांनी सादर केलेल्या एकपात्री प्रयोगांना प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली.
बालगटातून आराध्य पाटील यांनी प्रथम क्रमांक (रोख ३००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र) पटकावला. वज्रेश्वरी बंद यांनी द्वितीय क्रमांक (रोख २००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र) मिळवला, तर स्मद कोठेकर यांनी तृतीय क्रमांक (रोख १००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र) मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदीर्घ पाडवे, स्वरांगी जोशी आणि अनया पिंगळे यांना देण्यात आले.
खुल्या गटातून स्नेहल म्हात्रे यांनी प्रथम क्रमांक (रोख ३००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र), निकिता घाग यांनी द्वितीय क्रमांक (रोख २००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र) आणि मनाली इंगळे यांनी तृतीय क्रमांक (रोख १००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र) पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिक विल्सन खराडे, जीत जाधव आणि आदेश पवार यांनी मिळवले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, “या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल मी आयोजकांचे मनापासून कौतुक करतो. आज स्पर्धकांनी सादर केलेली कला अत्यंत निखळ आणि दर्जेदार होती. तुम्ही केलेले सादरीकरण खरोखरच उत्कृष्ट आहे. पुढील काळात तुम्हाला जी काही मदत लागेल, ती करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन.”
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार आणि कलाकार विजय पवार आणि रंगरचना कला मंचच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अभिनेते मकरंद पाध्ये, व ज्येष्ठ अभिनेते मनोहर लिमये यांनी काम पाहिले



Be First to Comment