
जाणून घ्या आजच्या दिवशी श्री गणपतीची पूजा कशी करावी ?
श्री गणेश जयंती
माघ शुद्ध चतुर्थी या दिवशी श्री गणेश लहरी प्रथम पृथ्वीवर अवतरल्या, म्हणून हा दिवस ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरा केला जातो. इंग्रजी महिन्यानुसार यावर्षी २२ जानेवारी २०२६ रोजी श्री गणेश जयंती आहे. चतुर्थी तिथीला श्री गणेश तत्त्व अधिक कार्यरत असल्याने या दिवशी केलेली पूजा, आरती, स्तोत्रपठण व नामजप भक्ताला अधिक आध्यात्मिक लाभ देतात. हे झाले व्यष्टी साधनेचे प्रयत्न, याचचबरोबर देवतेची अधिकाधिक कृपा होण्यासाठी समष्टी साधना करणे ही महत्त्वाचे असते. समष्टी साधना होण्यासाठी काय करायचे तेही या लेखातून आपण समजून घेणार आहोत.
सनातन धर्मानुसार प्रत्येक देवता ही केवळ पूजेची प्रतिमा नसून ती एक चैतन्यमय, सूक्ष्म तत्त्व आहे. श्री गणेशाची उपासना म्हणजे बाह्य उत्सवापुरती मर्यादित कृती नसून, अंतःकरणातील विकार दूर करून विवेकबुद्धी जागृत करण्याची साधना आहे. श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने श्री गणेश उपासनेचे शास्त्र, तसेच उत्सवाच्या नावाखाली कळत-नकळत होणारे देवतांचे विडंबन आणि ते रोखण्यासाठी आपण कोणती कृती करू शकतो, याचा विचार करणे आवश्यक आहे.
या दिवशी श्री गणपतीची पूजा कशी करावी?
प्रार्थना :
श्री गणेश जयंतीची अधिक लाभ होण्यासाठी पूजेच्या प्रारंभी मन एकाग्र करून नम्र भावाने प्रार्थना करावी. “हे श्री गजानना, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्याप्रती शुद्ध भक्तीभाव निर्माण होऊ दे. या पूजेतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे.”

हळद, कुंकू, गंध अर्पण करण्यामागील शास्त्र:
श्री गणेशाला अनामिकेने गंध लावावे. श्री गणेशाच्या आज्ञा चक्राच्या स्पर्शाने आपल्या मनातील खळबळ स्थिरावली असून आपले मन शांत झाले आहे असा भाव ठेवावा. तसेच अंगठा व अनामिका यांच्या चिमटीत प्रथम हळद आणि नंतर कुंकू घेऊन श्री गणेशाच्या चरणावर अर्पण करावे. या मुद्रेमुळे पूजकात भक्तिभाव जागृत होतो.
फुले आणि दुर्वा अर्पण करणे :
भाव तेथे देव अशी आपल्याकडे म्हण आहे. कोणत्याही देवतेची उपासना करतांना भाव महत्त्वाचा आहे. हे लक्षात घेऊन प्रत्येक कृती भावपूर्ण करणे महत्त्वाचे आहे. श्रीगणेशाला लाल जास्वंद वा अन्य लाल फुले शंकरपाळ्याच्या रचनेत वहावी. फुले वाहताना मनात श्री गणेशाच्या तेजस्वी तत्त्वाचे स्मरण करावे. श्री गणेश त्याचे तेज आपल्याला या लाल फुलांच्या माध्यमातून देत आहे असे अनुभवावे. कोवळ्या दुर्वा वाहताना, आपल्या मनातील कोमलता आणि नम्रता अर्पण होत आहे, असा भाव असावा ठेऊन प्रार्थना करावी, ‘ हे श्री गणेशा, माझे मन आणि बुद्धी या दुर्वाप्रमाणे शीतल, स्थिर आणि कोमल असून तुझ्या स्मरणात रममाण करून घे.’
उदबत्ती व अत्तर अर्पण करतांना भाव कसा असावा :
श्री गणेश पूजनात चंदन, केवडा किंवा चमेली गंधाची उदबत्ती असावी. त्या सुगंधात आपले विकार नष्ट होत आहेत, आणि आपल्यात श्री गणेशाचे गुण निर्माण होत आहेत असा भाव असावा. तसेच श्री गणेशाला हीना गंधाचे अत्तर अर्पण करावे. अत्तराच्या सुगंधाने मनाची प्रसन्नता अनुभवावी.
आरती, नामजप केल्याने होणारे आध्यात्मिक लाभ :
श्रीसमर्थ रामदासस्वामी लिखित चैतन्यमय ‘सुखकर्ता दुःखहर्ता…’ ही आरती म्हणताना प्रत्येक ओळ अंतर्मनापासून म्हणजे आर्ततेने म्हणावी. तसेच दिवसभरातील प्रत्येक कृति करताना “श्री गणेशाय नमः” हा नामजप अधिकाधिक करावा. नामजपामुळे मनातील अनावश्यक विचार कमी होऊन, दिवभर उत्साह आणि आनंद अनुभवता येतो.
श्री गणेशाचे पावित्र्य जपा
आता आपण व्यष्टी साधना म्हणून काय कराचे ते पाहिले, आता समष्टी साधना कशी करू शकतो, तेही पाहूया. मनुष्य उत्सवप्रिय आहे. त्यात अतिशयोक्ती म्हणजे काही मंदिरामध्ये श्री गणेश जयंतीला फुग्याची आरास आणि केक कापून त्याचा प्रसाद वितरण, गणेश जयंतीच्या मिरवणुकीत डिजे (DJ) लावणे यांसारख्या कृती बघायला मिळतात. यामुळे सात्त्विकता व चैतन्य कमी होऊन रज-तमाचे प्रमाण वाढते. देवतांचे विडंबन होते. मंदिरे ही चैतन्याची केंद्रे असल्याने तेथील वातावरण सात्त्विकच असायला हवे.
देवतांचे विडंबन होऊ नये यासाठी पुढील कृती कराव्या :
दैनंदिन वापरातील वस्तू जसे कपडे, पर्स, मुलांचे शाळेचे डब्बे, खेळणी, पाण्याची बाटली इत्यादींवर देवतांची चित्रे टाळावीत. या वस्तूंचा वापर झाल्यावर आपण त्या कुठेही ठेवतो. त्यामुळे देवतेची विडंबना होते. असे होऊ नये म्हणून आपण स्वतः योग्य कृती करावी आणि इतरांचे प्रबोधन करावे. उत्सवाचे आणि मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिरांनी सात्विक आणि जनप्रबोधन करणारे, राष्ट्र आणि धर्म जागृती करणारे कार्यक्रम आयोजित करावे.
अशा विविध माध्यमातून श्री गणेशाची कृपा संपादन करावी. शास्त्र समजून घेऊन, भक्तिभावाने केलेल्या पूजनात नक्कीच आनंद अनुभवता येतो आणि ईश्वराची कृपा संपादन करण्यास मदत होते. चला तर यंदाची गणेश जयंती भक्तीसागरात साजरी करूया.
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ – ‘गणपती’
श्री. श्रीकृष्ण उपाध्ये,
सनातन संस्था,
(संपर्क : 98192 42733)



Be First to Comment