
पेण मधुन जिल्हा परिषद मतदार संघासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल
पेण, ता. २१ (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी आज शेवटच्या एक दिवस अगोदर वडखळ गटाकडून तीन तर दादर आणि शिहू गटाकरीता प्रत्येकी एक आणि अपक्ष एक असे सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.तर शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी असंख्य उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत.


राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ५ फेब्रुवारी रोजी होत असून यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया मागच्या तीन दिवसांपासून सुरू झाली असली तरी पेण तालुक्यात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींकरीता पक्षांकडून कोणतीही युती आघाडी होत नसून याकरिता विलंब होत असल्याने अखेर अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या एक दिवस अगोदर पेण जिल्हा परिषदेच्या दादर गटासाठी माजी जिप.सदस्य तथा भाजप जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील, वडखळ गट भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, वडखळ माजी जिप.सभापती संजय जांभळे, उबाठा गट तालुकाप्रमुख समीर म्हात्रे, शिहू गटासाठी पल्लवी प्रसाद भोईर आणि त्यांचाच पुन्हा यासाठी अपक्ष अर्ज असे सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.तर उद्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय पक्षांकडून तसेच अपक्ष सुद्धा आपापले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने या निवडणुकीला खरी रंगत येणार असल्याचे दिसत आहे.


सदर निवडणूक वाशी खारेपाट विभागाच्या पिण्याच्या पाण्यासह अनेक समस्यांकरीता आपण लढवत असून या भागातील प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी येथील जनतेच्या माध्यमातून वेळप्रसंगी जनआंदोलन सुद्धा उभे करणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सभापती संजय जांभळे यांनी यावेळी सांगितले.



Be First to Comment