Press "Enter" to skip to content

मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर्स प्रीमियर लीग स्पर्धा संपन्न

अपेक्स हॉस्पिटल तळोजा यांनी पटकावले अजिंक्यपद ; सुखम हॉस्पिटल वॉरीयर्स ठरले उपविजेते

पनवेल / प्रतिनिधी

पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे दरवर्षी डॉक्टर्स प्रीमियर लीग ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदाचे वर्षी मोसारे येथील भव्य क्रीडांगणावर ही प्रतिष्ठित स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. येथील आत्माराम जानू पाटील क्रिकेट संकुलात असोसिएशन मधील डॉक्टर सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांनी क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला.

डॉक्टर कम्युनिटी मध्ये सुसंवाद,सांघिक भावना,व स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची संकल्पना रूढ व्हावी या प्रामाणिक उद्देशाने डॉक्टर वैभव मोकल यांच्या अध्यक्षतेखाली सलग नवव्या वर्षी ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. विशेष उल्लेखनीय म्हणजे महिला डॉक्टर्सनी देखील या स्पर्धेमध्ये हिरीरीने सहभाग नोंदविला. रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, खारघर, तळोजे, रोहा, कर्जत येथील खेळाडूंनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.

प्रीमियर लीग स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय निकषांप्रमाणे या स्पर्धेत देखील ऑक्शन प्रक्रियेनुसार संघ निश्चिती करण्यात आली होती.१७ व १८ जानेवारी रोजी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पडली. सदर स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, पेण चे आमदार रवी शेठ पाटील, राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, उद्योजक व भाजप नेते जे म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

पनवेल मधील सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुणे, वीर हॉस्पिटलचे डॉक्टर तेजस वीर, आधार हॉस्पिटलचे डॉक्टर संतोष पांढरे या मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

अपेक्स हॉस्पिटल तळोजा संघाने प्रीमियर लीग स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले तर सुखम हॉस्पिटल वॉरियर्स संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
अंतिम विजेत्या संघाला रोख रुपये ५० हजार व आकर्षक चषक प्रदान करण्यात आला तर उपविजेत्या संघाला रोख रुपये २५ हजार रुपये व आकर्षक चषक प्रदान करण्यात आला.

महिला बॉक्स क्रिकेट स्पर्धेत पी एम ए वॉरियर्स पेण संघाने विजेतेपद मिळविले, तर कर्जत अथेना वाररियर्स उपविजेता ठरला.
ह्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच,बेस्ट बॉलर,बॅट्समन व इतर अनेक वैयक्तिक स्वरूपाची पारितोषिके प्रदान करण्यात आली.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेले चुरशीचे सामने पाण्यासाठी अनेक नामवंत डॉक्टर्स तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रामधील दिग्गज नामवंत आवर्जून उपस्थित होते.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष डॉ वैभव मोकल. डॉ सचिन मोकल,डॉ.संदेश बहाडकर,डॉ.वैभव पाटील,डॉ.वैष्णवी नाईक,डॉ.स्वप्नील लोखंडे,डॉ.फिरोज शेख,डॉ.मेटकर,डॉ. अमित दवे,डॉ विवेक महाजन,डॉ प्रतिज्ञा साबणे, डॉ सारिका मोकल,डॉ परब, डॉ रसिका पाटील,डॉ.बाविस्कर,डॉ अर्चना गावंड,डॉ मुंबईकर व असोसिएशनचे सर्व बोर्ड व कोअर कमिटीने अथक परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.