

दुर्गमध्ये दुमदुमली ‘शौर्या’ची ललकारी : १००० हून अधिक युवकांचा स्वसंरक्षणासह राष्ट्र-धर्म रक्षणाचा संकल्प
दुर्ग (छत्तीसगड) – “जेव्हा जेव्हा आपल्या माता-भगिनींवर आणि धर्मावर संकटे आली, तेव्हा तेव्हा आपल्या महापुरुषांनी मोठ्या शूरतेने आणि वीरतेने त्याचा सामना केला. वर्तमान स्थिती देखील आव्हानात्मक आहे. आज धर्म आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी घराघरांतून छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांनी केले.
हिंदू जनजागृती समिती आणि वैदिक गुरुकुल वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्ग येथील महेश कॉलनी (पुलगाव, छत्तीसगड) मध्ये आयोजित दोन दिवसीय अनिवासी ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’त ते मार्गदर्शन करत होते. या महाशिबिरात दुर्ग, राजनांदगाव, रायपूर, खैरागड यांसह अनेक जिल्ह्यांतील १००० हून अधिक युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि स्वसंरक्षणासह धर्मरक्षणाचा संकल्प केला.
कराटे, लाठी आणि नानचाकूचे प्रशिक्षण या शिबिरात युवकांना केवळ बौद्धिकच नव्हे, तर शारीरिकदृष्ट्याही सक्षम करण्यात आले. मुख्य प्रशिक्षक श्री. निरंजन चोडणकर आणि त्यांच्या सहकारी प्रशिक्षकांनी युवकांना कराटे, लाठी काठी आणि नानचाकू चालवण्याचे प्रशिक्षण दिले. कठीण प्रसंगात स्वसंरक्षण कसे करावे, याचे सोपे आणि प्रभावी उपाय प्रात्यक्षिकांद्वारे (Demo) दाखवण्यात आले.
मान्यवरांचे प्रभावी मार्गदर्शन:
छत्तीसगडचे शिक्षणमंत्री श्री. गजेंद्र यादव : “ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊंनी बाल शिवरायांना शस्त्र आणि शास्त्राचे शिक्षण देऊन हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, तीच धग आज प्रत्येक युवकामध्ये जागृत करण्याची गरज आहे. बलवान शरीर आणि प्रबळ मनोबलाच्या जोरावरच आपण आपले राष्ट्र आणि कुटुंब सुरक्षित ठेवू शकतो.”
भाजपचे जेष्ठ नेते श्री. प्रबल प्रताप जुदेव : “सनातन धर्माच्या रक्षणासाठी आजच्या युवकांना ‘शास्त्र आणि शस्त्र’ या दोन्हीचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. युवकांचा हा उत्साह पाहून सनातन धर्म सुरक्षित हातात असल्याचा विश्वास वाटतो.”
संत पू. अशोक पात्रीकर (सनातन संस्था): “शारीरिक बळासोबतच आत्मबळही आवश्यक आहे. यासाठी प्रतिदिन ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप करा. आता अन्याय सहन करायचा नाही, तर त्याचा प्रतिकार करायचा आहे.”
श्री. सुनील घनवट (राज्य संघटक, हिंदू जनजागृती समिती): “डाव्या विचारसरणीच्या आणि देशविरोधी शक्ती युवकांना शौर्यहीन बनवू पाहत आहेत. याविरोधात आपल्याला सजग राहावे लागेल. स्वसंरक्षण प्रशिक्षण ही राष्ट्ररक्षणाची पहिली पायरी आहे.”
प्रशासनाचे सहकार्य: दुर्गचे पोलीस अधीक्षक (SP) श्री. विजय अग्रवाल आणि उपअधीक्षक (DSP) श्रीमती भारती मारकाम यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना स्वसंरक्षणासाठी असलेल्या कायद्याची माहिती दिली आणि आश्वस्त केले की, “जर तुम्ही स्वसंरक्षणासाठी पाऊल उचलले, तर कायदा पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे.”
वैदिक गुरुकुल वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अधिवक्ता आशिष शर्मा यांनी गुरुकुलच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अंजली कानस्कर आणि श्रीमती मेघा राठी यांनी केले, तर प्रस्तावना श्री. कमल बिस्वाल यांनी मांडली. यावेळी महापौर श्रीमती अलका बागमार, आय.जी. श्री. विनोद अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



Be First to Comment