Press "Enter" to skip to content

विद्यार्थ्यांनो, आयुष्य हसतखेळत जगा : महेंद्रशेठ घरत

महात्मा फुले कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एनएसएसच्या श्रम-संस्कार शिबिराचे शांतिवन-नेरे येथे आयोजन

पनवेल : “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा आणली. मीसुद्धा रयतचा विद्यार्थी आहे, आपल्याच महाविद्यालयात पदवीधर झालो. त्या काळी प्रवासासाठी एसटी हे एकमेव साधन होते. तासा-दोन तासांनी येणारी एसटी पहाटे भाजीपाला विकायला नेणाऱ्या गावकऱ्यांनी बऱ्याच वेळा भरलेली असे. त्यामुळे आमच्या शेलघर बस थांब्यावर बस थांबली नाही, तर गव्हाण फाटा येथे चालत जाऊन दुसरी बस पकडावी लागत असे. शेतीच्या कामांत लावणी, कापणी, डोक्यावर भाताचे भारे वाहून ते उडव्यावर रचणे ही कसरत असायची, त्यानंतर भाताची झोडणी करताना हात लालेलाल व्हायचे, जेवता येत नसे इतपत, पण अपार कष्ट आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही, या आई-वडिलांच्या शिकवणीने माझा पाया भक्कम झाला, असे मला वाटते. ‘रयत’मुळेच मी आज जगाच्या कामगार क्षेत्रांत लीलया वावरतोय. त्यामुळे ‘रयत’चा मी कायम ऋणी आहे. त्यामुळेच ‘रयत’ला मी सढळ हाताने देणगी देतो, ते माझे कर्तव्य आहे. त्यामुळे महाविद्यालय राबवित असलेली श्रम संस्कार शिबिर ही कल्पना उत्तम आहे, विद्यार्थ्यांची चांगल्याप्रकारे जडणघडण होण्यास निश्चितच उपयोगाची आहे. विद्यार्थी मित्रानो, आमच्या वेळच्या विद्यार्थिदशेतील प्रश्न, आव्हाने वेगळी होती. आता तुमच्यासमोर माहितीचा खजिना आहे, आव्हाने आहेतच, पण शिकत असताना काम-धंद्याचा विचार करा, सुरुवातीला पगार किती मिळतो, हा विचार करू नका. आयुष्यात बरेवाईट छोटे-मोठे प्रसंग येतातच, पण कधीही टोकाचे पाऊल उचलू नका. आयुष्य हसतखेळत जगा,” असे महेंद्रशेठ घरत यांनी एनएसएसच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.

त्यांच्या हस्ते पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एनएसएसच्या श्रम-संस्कार शिबिराचे शांतिवन-नेरे येथे उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, माजी उपप्राचार्य, डॉ. अशोक आढाव, डॉ. राजाराम पाटील, अॅड. प्रमोद ठाकूर, निलकंठ कोळी आणि महाविद्यालयाचा शिक्षकवृंद उपस्थित होता.

महेंद्रशेठ घरत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, “आजघडीला तुमचे आई-वडील तुम्हाला काहीही कमी पडू देत नाहीत, परंतु तुम्ही शिकून मोठे व्हाल तेव्हा आई-वडिलांना सांभाळा. शिक्षक आणि रयत शिक्षण संस्था यांना कधीही विसरू नका. मी संघर्षातून आलोय, पण आयुष्य हसतखेळत जगतोय, सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करा आणि असे जगा की, तुमचे नाव सातासमुद्रापार गेले पाहिजे.
यावेळी डॉ. प्राचार्य गणेश ठाकूर म्हणाले, “श्रम आणि संस्कार ही शिदोरी आहे. श्रम करणारा विद्यार्थी यशस्वी होईल. कमवा आणि शिका योजना आदर्शवादी आहे. महाविद्यालयाची कामगिरी उत्तम आहे. महाविद्यालय फक्त शिक्षण देत नाही, त्यापलीकडे खूप काही विद्यार्थ्यांना देतेय. आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी महेंद्रशेठ घरत हे आयडॉल आहेत. संस्कार खूप महत्त्वाचे आहेत, आपला विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात चमकला पाहिजे, अशी रयत शिक्षण संस्थेची धारणा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो आपल्या आयुष्यात अत्युच्च शिखर गाठा.”

यावेळी प्रमोद ठाकूर म्हणाले, “महेंद्रशेठ घरत हे विद्यार्थिदशेत होते, तसेच आहेत. तोच उत्साह, तोच जोम, दिलदार माणूस आहेत. आपण कर्मवीरांचे ऋण विसरू शकत नाही. विद्यार्थ्यांनो मोबाईलचा दुरूपयोग करू नका, त्यात अडकून पडू नका, थोडासा दूर ठेवा, फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.”

यावेळी शांतिवनच्या प्रमुख दिवंगत रक्षाबेन मेहता यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी अतुल पोखरकर प्रास्ताविक केले. रूपश्री ठाकूर यांनी सूत्रसंचालन, तर रेश्मा खुटारकर यांनी आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.