
प्रभाग १९ मध्ये प्रचारात महायुतीची जोरदार आघाडी
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १९ मध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय महायुतीने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रभागात आतापर्यंत झालेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारांकडून महायुतीला सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या प्रभागातील चार उमेदवारांपैकी दर्शना भोईर आणि रुचिता लोंढे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली असून, उर्वरित दोन जागांसाठी राजू सोनी आणि सुमीत झुंझारराव हे महायुतीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज (रविवार, दि. ११) पनवेलमहापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग १९ मधील कल्पतरू सोसायटी व लगतच्या परिसरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत गाठीभेटी घेतल्या.
या वेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष अनिल भगत, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत, अर्चना ठाकूर, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, प्रमोद ठाकूर, उल्हास झुंझारराव, पूनम ठाकूर, नितीन जोशी, भार्गव ठाकूर, विनायक मुंबईकर, यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग १९ मधील विकासाचा वेग अधिक उंचावण्यासाठी राजू सोनी आणि सुमीत झुंझारराव यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.



Be First to Comment