
शहरातील अतिक्रमण हटवून वाहतूक कोंडी दूर करावी लागणार – आमदार रवीशेठ पाटील
पेण. (वार्ताहर) : पेण नगरपालिका भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रितम ललित पाटील यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.यावेळी त्यांचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्यासह अधिकारी वर्गाने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आहे.
नुकताच झालेल्या पेण नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील यांनी आम्ही पेणकर विकास आघाडीच्या उमेदवार रिया धारकर यांचा ५ हजार ८६१ मतांनी पराभव करून घवघवीत यश संपादन केले होते.त्या नगराध्यक्ष पदाचा आज पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार रवीशेठ पाटील यांच्या उपस्थितीत वैकुंठ निवास ते पेण नगरपालिका कार्यालय पर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यादरम्यान नगरपालिका कार्यालय जवळ अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे जंगी स्वागत केले त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यालयात जाऊन नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी बोलताना आमदार रवीशेठ पाटील म्हणाले की शहराला विकासात्मक गती देण्यासाठी सर्वप्रथम अतिक्रमण हटवून वाहतूक कोंडी दूर केली पाहिजे तसेच येत्या पाच वर्षात प्रत्येक प्रभागातील कामे करून शहराचे नाव लौकिक करणे गरजेचे आहे.येत्या काळात पेणच्या विकासाला अधिक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा चित्रलेखा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिकेत तटकरे, उद्योजक रशाद मुजावर, उद्योजक राजू पिचिका, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दयानंद भगत, शहराध्यक्ष जितू ठाकूर, गटनेते अनिरुद्ध पाटील, माजी जिप.सदस्य डी.बी.पाटील, प्रभाकर म्हात्रे, कौसल्या पाटील, भाजप तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, संजय डंगर आदिंसह भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे पदाधिकारी तसेच नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.



Be First to Comment