
ग्राम पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ग्राममित्र प्रशिक्षणाची सुरवात
प्रतिनिधी : समीर बामुगडे
ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्राम पातळीवर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसाठी “ग्राममित्र प्रशिक्षणाचे ची सुरवात करून सावित्री बाई फुलेंना अनोखी मानवंदना दिली आहे. ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या बांधणवाडी येथील कार्यालयात संपन्न झालेल्या या प्रशिक्षणाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार सुवर्णा दिवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या प्रशिक्षणात ग्राम स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत, महसूल, ग्रामविकास, पोलीस, वनविभाग, माहिती अधिकार, आरोग्य यंत्रणा या शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणांविषयी माहिती देण्यात येणार आहे. तसेच लेखन, वक्तृत्व, नेतृत्व, संवादकौशल्य यांचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्राम स्तरावर काम करणारा कार्यकर्ता घडावा या हेतूने ग्राममित्र प्रशिक्षणाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रशिक्षणात रायगड भूषण संतोष ठाकूर, अध्यक्ष-ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, उदय गावंड, सामाजिक कार्यकर्ते आणि राजेश रसाळ, समन्वयक- ग्राममित्र हे प्रशिक्षण देणार आहेत. तसेच ३३ ग्राममित्र प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. ग्राममित्र प्रशिक्षणाचा कालावधी ३ महिन्याचा असून प्रत्येक रविवारी हे प्रशिक्षण होणार आहे. समाजासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्राम स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ग्राममित्र प्रशिक्षणाचे उदघाटन करून अनोखी आदरांजली वाहण्यात आली.उद्घाटन सत्रामध्ये सहभागी कार्यकर्त्यांना आदर्श गाव संकल्पनेविषयी माहिती देण्यात आली.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार, श्रीमती. सुवर्णा दिवेकर यांनी सावित्रीबाईंच्या आदर्श लक्षात घेता समाज विकासाच्या या कार्यक्रमात महिलांनी सर्वाधिक सहभाग घ्यावा असे आवाहन करीत सदर प्रशिक्षण दरम्यान किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी कोणत्याही शासकीय कार्यालयात कामासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
सदर उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक ग्राममित्र चे समन्वयक राजेश रसाळ यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की सध्या गाव पातळीवर राजकीय पुढारी आणि कार्यकर्त्यांची मक्तेदारी असल्यासारखे वातावरण असल्यामुळे ज्याची सरशी त्याची खुर्ची अशा पद्धतीने गावांमध्ये विविध गटतट निर्माण होत आहेत ज्यामुळे गावाचा सर्वसमावेशक पद्धतीचा विकास होताना दिसत नाही त्यामुळे ग्राममित्रच्या प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीं गावातील ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास वाटतो. म्हणून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी प्रशिक्षणात सहभागी व्हावे असे आवाहन ठाकूर यांनी यावेळी केले.
यावेळी रुपेश कदम, ॲड.समीर भालेकर उमेद अभियान प्रभाग समन्वयक भावना पाटील, पाणलोट क्षेत्र विकास तज्ञ श्रीकांत म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. तर प्रशिक्षण समन्वयक राजेश रसाळ, राजू पाटील, सचिन पाटील, रणजीत पाटील यांनी ह्या प्रशिक्षणाचे व्यवस्थापन केले.



Be First to Comment