
पनवेल दि.०३(वार्ताहर): पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संघटनात्म पातळीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील युती संदर्भातील सर्व निर्णय, निवडणुकीचे नियोजन, विविध पक्षांमधील समन्वय तसेच संपूर्ण निवडणूक कार्यभाराची जबाबदारी म्हणजेच निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी पनवेल महानगरपालिकेचे महानगरप्रमुख अॅड. प्रथमेश सोमण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
या संदर्भातील अधिकृत पत्र प्रसिद्ध करण्यात आले असून, ते पनवेलचे शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यां पाठविण्यात आले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची भूमिका अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. युतीसंदर्भातील चर्चा, उमेदवार निवड, प्रचाराचे नियोजन, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधणे तसेच निवडणुकीदरम्यान येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वाखाली पार पाडल्या जाणार आहेत. संघटनात्मक अनुभव, कायदेशीर जाण आणि कार्यक्षम नेतृत्वाच्या जोरावर पनवेल महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला यश मिळेल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. या नियुक्तीमुळे पनवेल महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तयारीला वेग येणार असून, आगामी राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.



Be First to Comment