
नवनिर्वाचित नगरसेविका कलावती पाटील यांच्याकडून प्रभागाच्या नागरी समस्यांबाबत निवेदन
पेण, ता. 2 ( वार्ताहर ) :- पेण नगरपालिकेचा निकाल नुकताच जाहीर होऊन यात प्रभाग एक मधून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका कलावती पाटील यांनी या प्रभागातील प्रलंबित असणाऱ्या नागरी समस्यांबाबत तात्काळ सोडविण्यासाठी नगरपालिकेचे अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
पेण पालिकेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश प्राप्त केले असून महायुतीतून प्रभाग एक मधून निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका कलावती पाटील यांनी आपल्या प्रभागातील समस्यांची तातडीने पाहणी केली असता यामध्ये प्रभागातील कुंभार आळी, नंदिमाळ नाका, परीट आळी, तरे आळी, प्रभू आळी आदी भागातील शौचालयांची झालेली दुरवस्था तसेच मोठा सांडपाण्याचा नाला, छोटी मोठी गटारे यांची नियमित साफसफाई, औषध फवारणी, खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती यासह शुद्ध आणि मुबलक पाणी, रात्रीच्या वेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पथदिवे सुरळीत करणे, प्रभागातील महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आदी गोष्टी ज्या अपूर्ण तसेच काही समस्या प्रलंबित आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे हेतूनेच सदरचे निवेदन पालिकेच्या अधिकारी किरण शहा यांच्याकडे दिले आहे.आमदार रवीशेठ पाटील, खासदार धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे, नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून अधिक विकास निधी आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित कलावती पाटील यांनी सांगितले आहे.
सदर निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते हितेश पाटील, संजय पाटील, पार्थ शहा, तुषार गुरव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरसेविका कलावती पाटील यांनी सदर केलेल्या निवेदनानुसार ज्या ज्या विभागाशी निगडित समस्या आहेत त्या विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांच्या समस्या सोडविल्या जातील प्रभाग क्रमांक एक मधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे पण उर्वरित काम तेही लवकरच सुरू करण्यात येईल यांसह स्वच्छता, साफसफाई यांकडे सुद्धा विशेष लक्ष देऊन निवेदनातील प्रलंबित प्रश्न त्यांच्या समस्या देखील जसजसे निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे सोडविल्या जातील.
जीवन पाटील – मुख्याधिकारी पेण नगर परिषद



Be First to Comment