Press "Enter" to skip to content

पनवेल महानगरपालिका निवडणुकीत “बैलबाजार” तेजीत

महाविकास आघाडीच्या आब्रूची लख्तरे वेशीवर ; भाजपा चे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध

पनवेल : प्रतिनिधी

२०२६ ची पनवेल महानगर पालिकेची निवडणूक ही अगदी वेगळी म्हणावी लागेल. इतिहासात पहिल्यांदाच या निवडणुकीत तब्बल ७ नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याचा विक्रम घडला आहे. महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनवेलमध्ये नगरपालिका असतानाही असा विक्रम झाला नव्हता. परंतु पनवेल महापालिका निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीच्या गाफिलपणामुळे त्यांच्यावर अशी नामुष्की ओढावली आहे.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या तब्बल सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात प्रभाग क्रमांक १८ ( अ ) मधून सौ. ममता प्रितम म्हात्रे, प्रभाग क्रमांक १८ ( ब ) मधून नितीन जयराम पाटील, प्रभाग क्रमांक १८ ( क ) मधून स्नेहल स्वप्निल ढमाले, प्रभाग क्रमांक १९ ( अ ) मधून दर्शना भगवान भोईर, प्रभाग क्रमांक १९ ( ब ) रूचिता मुध्दा गुरूनाथ लोंढे, प्रभाग क्रमांक २० ( अ ) अजय तुकाराम बहीरा, प्रभाग क्रमांक २० ( ब ) डॉ. प्रियांका तेजस कांडपिळे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

दरम्यान हे घडलं कसं ? हा प्रश्न सध्या सामान्य पनवेलकर एकमेकांना विचारत आहेत. महाविकास आघाडीतील नेते मंडळी हे सगळं घडत असताना काय करत होते ? महाविकास आघाडी कडे उमेदवार नव्हते म्हणून जो मागेल त्याला तिकीट ही योजना राबविण्यात आली का ? उमेदवारी घेऊन मग सेटिंग झाल्यावर ती मागे घेण्यासाठीच या उमेदवारांनी महाविकास आघाडी ची उमेदवारी घेतली का ? असे अनेक प्रश्न पनवेलकरांच्या चर्चेचा विषय झाले आहेत. कारण काहीही असो पण यामुळे मात्र महाविकास आघाडीच्या अब्रू ची लख्तरे वेशीवर टांगली गेली आहेत हे नक्की !

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.