




गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव; विद्यार्थ्यांनी जिंकली रसिकांची मने
पाणदिवे: उरण तालुक्यातील पाणदिवे येथील ‘हुतात्मा परशुराम रामा पाटील शिक्षण संस्थे’च्या ‘पुंडलिक रामा पाटील इंग्रजी माध्यम शाळे’चा २० वा वर्धापनदिन आणि वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष भाईचंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पाणदिवे येथील हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात हा रंगारंग कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आणि महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील उपस्थित होते. आपल्या मनोगतात मनोज पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “संस्थेचे अध्यक्ष भाईचंद पाटील आणि सचिव प्रकाश पाटील या दोन बंधूंनी २० वर्षांपूर्वी पाणदिवे सारख्या छोट्या गावात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचे धाडस दाखवले. त्यांच्या या दूरदृष्टीमुळेच परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची दारे खुली झाली असून, आज या शाळेचे अनेक विद्यार्थी उच्च पदांवर कार्यरत आहेत. ही बाब शाळेसाठी आणि गावासाठी अत्यंत अभिमानाची आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने झाली. संस्थेचे सचिव आणि निवृत्त शिक्षण निरीक्षक प्रकाश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या २० वर्षांच्या प्रगतीचा आढावा मांडला. या सोहळ्यात शाळेतील विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा, तसेच दहावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भाईचंद पाटील, सचिव प्रकाश पाटील, कार्यकारिणी सदस्या ममता पाटील, मनोज पाटील, शाळेची माजी विद्यार्थिनी रिया पाटील, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष उल्हास पाटील, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनिका पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सोनाली घासे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका योगिता गावंड तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि कलाविष्कार सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाविका पाटील व हेमाली म्हात्रे यांनी अतिशय खुमासदार शैलीत केले.



Be First to Comment