
पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः तळोजा औद्योगिक वसाहतीत भीषण आगीची घटना घडली. येथील तळोजा औद्योगिक वसाहतमधील तीन कारखान्यांना एकाच वेळी आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रात्री साडेनऊच्या सुमारास लागलेली ही आग पहाटे साडेपाच वाजेपर्यंत आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कारखान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक बी-42 वरील विघ्नहर्ता कंपनीमध्ये अगरबत्ती निर्मितीसाठी वापरल्या जाणार्या रसायनांची सुमारे 150 पिंपे साठवण्यात आली होती. या पिंपांमधील सॉल्व्हन्ट रसायनांनी अचानक पेट घेतल्याने भीषण स्फोट झाले आणि आगीने उग्र स्वरूप धारण केले. स्फोटाच्या तीव्रतेमुळे कारखान्यातील लोखंडी पत्रे तुटून थेट रस्त्यावर कोसळली. उडालेल्या रसायनांमुळे कंपनीसमोरील रस्ता व गटारांमधून आग पसरत गेली आणि लगतच्या आणखी बी – 41 आणि बी – 43 या दोन कारखान्यांनाही तिचा फटका बसला.
आगीचे लोण वाढत असल्याचे लक्षात येताच कारखान्यातील कामगारांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बाहेर पळ काढला आणि आपले प्राण वाचवले.
तळोजा एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी रत्नाकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सव्वा दहा वाजता आगीची माहिती मिळताच वाहतूक कोंडी असूनही अवघ्या पाच मिनिटांत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता पाहता अतिरिक्त बंब मागवण्यात आले. पहाटेपर्यंत सतत पाणी व फोमचा मारा करून अखेर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. मात्र, रसायनांनी पेट घेतल्यामुळे आग अधिक पसरली असली तरी तिचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा व्यवस्था व रसायन साठवणीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.



Be First to Comment