Press "Enter" to skip to content

दिबा हे राष्ट्रीय नेतेच : महेंद्रशेठ घरत

भूमिपुत्रांच्या छाताडावर विमानतळ : महेंद्रशेठ घरत

उलवे, ता. २१ : “मंडळ आयोग आणि ओबीसींच्या लढ्यात दिबा अग्रणी होते. साडेबारा टक्के जमिनीचा कायदा देशभर लागू झाला दिबांच्या आंदोलनांमुळेच, १९८४ च्या आंदोलनात पाच हुतात्मे झाले.  त्यांच्या बलिदानामुळे. सिडकोचा डोलारा भूमिपुत्रांमुळेच उभा आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी १५  हजार रुपये एकरी सिडकोने घेतल्या. त्याच जमिनीवर अब्जावधी रुपये सिडको आज कमावतेय. भाजप हे संधीसाधू राजकारण करतेय; परंतु दिबांच्या नावाबाबत जो चालढकलपणा सुरू आहे तो  सर्वसामान्य भूमिपुत्र सहन करणार नाही. त्यामुळे आम्हा सर्वांची अस्मिता, अभिमान फक्त दिबाच!”

महेंद्रशेठ पुढे म्हणाले, “दिबा हे अतिशय साधे आणि नि:स्वार्थी जीवन जगले. हातावर पोट असणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांचे घर बांधले. राज्यात, देशात जिथे जिथे सर्वसामान्यांवर सरकारने अन्याय-अत्याचार केला तेव्हा दि. बा. पाटील साहेब पेटून उठले. भूमिपुत्रांचे तर ते तारणहार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भूमिपुत्रांच्या छाताडावर वसले आहे. भूमिपुत्रांच्या असीम त्यागामुळेच विमानतळ साकारलेय. कारण भूमिपुत्रांनी फक्त जमिनीच दिल्या नाहीत तर घरादारांवर तुळशीपत्र ठेवले. दिबांमुळेच भूमिपुत्रांना काही अंशी न्याय मिळाला, जागतिक पातळीवर जे काही नेते समाजासाठीच जगले, त्यात दिबांचे नाव आघाडीवर असेल. दिबा हे राष्ट्रीय नेतेच आहेत आणि त्यांचेच नाव विमानतळाला हवे, त्यामुळे भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या सहनशीलतेचा सरकारने अंत पाहू नये,” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत गव्हाण येथे म्हणाले. त्यांच्या हस्ते ४० प्लस क्रिकेट टुर्नामेंटचे उद्घाटन शनिवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उद्योजक मनोज फडकर, जय श्रीराम ४० प्लस क्रिकेट क्लब गव्हाण आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच उपसरपंच चषक, पाले-उरण चषकाचे उद्घाटनही महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते झाले. यावेळी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, आवरे सरपंच निराबाई पाटील, उरण युवक  अध्यक्ष  नितेश पाटील, पिरकोन सदस्य मंगेश म्हात्रे, आर. बी. म्हात्रे, रामचंद्र म्हात्रे, आनंद ठाकूर, राजेंद्र भगत, संजय म्हात्रे, विजय म्हात्रे आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन सुनील वर्तक सर यांनी केले. आयोजक माजी उपसरपंच समाधान म्हात्रे आणि सहकारी होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.