

पनवेल, दि . १७ (वार्ताहर) : पोलिस कर्मचारी दिलेला बंदोबस्त किंवा सोपवलेली जबाबदारी चोख निभावतात की नाही हे यापुढे जीपीएस ‘ट्रॅक’द्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित कळणार आहे. बंदोबस्ताचे ठिकाण सोडून इतरत्र थांबण्याचे प्रकार टाळण्यासह बंदोबस्तामुळे गुन्हेगारी नियंत्रणात येते का? हेही या माध्यमातून पडताळले जाणार आहे. यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम हाती घेतला असून, महिन्याभरात तो पूर्ण ताकदीने राबवला जाणार आहे.
पनवेल परिसराचा होणाऱ्या विकासाच्या तुलनेत पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ आहे. परिणामी गुन्हेगारांचा शोध घेणे, रोजचे बंदोबस्त यांचे नियोजन करताना अधिकाऱ्यांना झळ बसते. त्यातच काही कर्मचारी दिलेला बंदोबस्त चोखरित्या न बजावता भलत्याच ठिकाणी बसलेले असतात. याचा परिणाम गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याच्या कामावरही होतो. रस्त्यावर पोलिस दिसले तरीही अनेकदा गुन्हेगारी कृत्याला आळा बसतो. हीच परिस्थिती वाहतूक पोलिसांच्या बाबतीतदेखील आहे. अनेकदा गुन्हेगारांच्या मागावर राज्यभरात किंवा राज्याबाहेर असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेचाही प्रश्न गंभीर असतो. ते नेमके कोणत्या ठिकाणी व कोणत्या अवस्थेत आहेत याचीही क्षणाक्षणाची माहिती थेट पोलिस आयुक्तालयात नोंद होणार आहे.
सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवला जात असून, त्यात समोर येणाऱ्या बाबी पडताळल्या जात आहेत. याशिवाय महिन्याभरात पूर्ण ताकदीने हा उपक्रम राबवला जाणार आहे . अनेकदा बंदोबस्तावर नेमलेले पोलिस परस्पर गैरहजर राहण्याचे प्रकार घडत असतात. यामुळे कागदोपत्री नेमलेल्या बंदोबस्ताच्या ठिकाणी प्रत्यक्षात कोणीच हजर नसते किंवा निश्चित केलेल्या जागेऐवजी वेगळ्याच ठिकाणी कर्मचारी भलतेच कर्तव्य बजावत असतात. ट्रॅकमुळे वरिष्ठांना अपडेट समजणार असल्याने कामचुकारांना आळा बसणार आहे. गुन्हेगारी नियंत्रणासाठी नाकाबंदीचा केली जाते. मात्र, एक मार्ग बंद झाला तरीही इतर मार्गांनी गुन्हेगार निसटू शकतात. अशा वेळी नाकाबंदीच्या नियोजनाचीही जुळवाजुळव जीपीएस ट्रॅकिंगच्या माध्यमातून होऊ शकते. त्यात कोणत्या ठिकाणी किती कर्मचारी हजर आहेत, हे तपासले जाणार आहे. तसेच यामुळे वाहतूक कोंडी प्रश्न सुद्धा निकाली निघणार आहेत .



Be First to Comment