
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या समारोपातून शौर्याची प्रेरणा !
नवी दिल्ली - देशाच्या राजधानीतील भारत मंडपम् येथे पार पडलेल्या दोन दिवसीय ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला देशभरातून ३ हजारांहून अधिक हिंदू, तसेच ८०० हून अधिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी समस्त संत-महंत, मान्यवर, मंत्री, उद्योजक, अधिवक्ता, विचारवंत, संरक्षणतज्ञ आदींनी सनातन राष्ट्र स्थापन्यासाठी संस्कृती रक्षणाचा निर्धार व्यक्त केला, तर ‘सुरक्षा, संस्कृति आणि शौर्य’ या विषयांवरील उद्बोधन, तसेच शस्त्रप्रदर्शन यांमुळे सर्वांमध्ये शौर्याची प्रेरणा निर्माण झाली.
…तर आपला भारत ‘हिंदु राष्ट्र’ नव्हे, तर ‘प्रजासत्ताक हिंदु राष्ट्र’ बनेल ! – स्वामी विज्ञानानंदजी
या महोत्सवाच्या समापनाच्या वेळी झालेल्या सनातन राष्ट्र संकल्प संतसभेत ‘हिंदूंचे सांस्कृतिक घोषणापत्र’ या विषयावर बोलतांना विश्व हिंदु परिषदेचे सह महामंत्री स्वामी विज्ञानानंदजी म्हणाले की, जे राष्ट्र हिंदु जीवनपद्धत स्वीकारील, ते हिंदु राष्ट्र बनेल. स्वातंत्र्यपूर्व भारत समृद्ध होता. सूर्याच्या उदयापासून ते अस्तापर्यंतचा सर्व भूप्रदेश हिंदूंच्या अधिपत्याखाली होता. गतकाळात हा सर्व प्रदेश आपण गमावला आहे. आज हिंदूंची केवळ भारतातीलच काही राज्यांमध्ये सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी केवळ दांडिया, होळी किंवा दिवाळी यांसारख्या सणांमध्ये रमून न जाता उर्वरित प्रदेश जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे आपला देश केवळ हिंदु राष्ट्रच नाही, तर ‘प्रजासत्ताक हिंदु राष्ट्र’ बनेल.
केंद्र सरकारने चारित्र्य निर्माण करणारे शैक्षणिक धोरण आखावे ! – पू. पवन सिन्हा गुरुजी
चारित्र्यवान लोकच धर्मयुद्ध करू शकतात. ज्यांच्याकडे चारित्र्य नाही, ते युद्ध जिंकू शकत नाही. भारताकडे चरित्र्य असल्यामुळे पाकिस्तानच्या विरोधातील अनेक लहान-मोठ्या युद्धांत भारताला यश मिळाले. चारित्र्य निर्माण करणे सोपे नाही आणि चारित्र्याचा शिक्षणाशी काहीही संबंध नाही. अनेक उच्च विद्याविभूषित लोक भ्रष्टाचारी आहेत. सध्याचे शिक्षण युवकांमध्ये चारित्र्य निर्माण करू शकत नाही, त्यामुळे केंद्र सरकारने चारित्र्य निर्माण करणारे शैक्षणिक धोरण आखावे, असे आवाहन ‘पावन चिंतनधारा आश्रमा’चे संस्थापक पू. पवन सिन्हा गुरुजी यांनी केले.
...संविधानामध्ये हा भेदभाव का ? : या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले की* , आज भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत ‘हा देश सेक्युलर आहे’, असा उल्लेख आहे; मात्र राज्यघटनेच्या २५ व्या कलमापासून पंथाच्या आधारावर भेदभाव करण्यात आला आहे. म्हणजे अल्पसंख्यांकांसाठी वेगळे नियम, वेगळे प्रावधान (तरतुदी) आदी करण्यात आले आहे. सेक्युलर देशात असा भेदभाव काय कामाचा ?
शंखनाद महोत्सवासाठी उपस्थितांनी येथून पुढे आपापल्या क्षेत्रात सनातन राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करण्याचा सुसंकल्प केला पाहिजे, असे आवाहन छत्तीसगड येथील ‘शदाणी दरबारा’चे पीठाधीश्वर प.पू. युधिष्ठिरलाल महाराज यांनी केले. तर हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ म्हणाले की, ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’, म्हणजे ‘माझ्या भक्ताचा नाश होणार नाही’, असे भगवंताचे वचन आहे. त्यामुळे आपत्काळापासून रक्षण होण्यासाठी विविध सुरक्षात्मक उपायांसह ईश्वराचे भक्त बनणे आवश्यक आहे. या महोत्सवाची सांगता ‘वन्दे मातरम्’ने झाली. या महोत्सवासाठी भारत शासनाच्या कला, संस्कृती विभाग आणि भाषा विभाग, सांस्कृतिक मंत्रालय, तसेच दिल्ली राज्य पर्यटन विभाग यांनी सहकार्य केले.



Be First to Comment