Press "Enter" to skip to content

३२५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन 

पनवेल महापालिकेचा विकास अविरत सुरू राहील – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

पनवेल (प्रतिनिधी) पनवेलचे झपाट्याने नागरीकरण होत असून हे क्षेत्र एज्युकेशन हब म्हणून पुढे येत आहे. पनवेल महापालिकेचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल महापालिका दत्तक घेतली आहे. त्यामुळे यापुढेही नागरिकांचे प्रश्न मार्गी लावतानाच विकासाची गंगा अविरतपणे सुरू राहील, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी आज येथे दिली.

कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये सुमारे ३२५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पनवेल येथील लोकनेते दि.बा. पाटील विद्यालयात मार्गदर्शानात्मक कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, माजी महापौर कविता चौतमोल, आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, आरपीआयचे प्रभाकर कांबळे यांच्यासह माजी नगरसेवक, माजी नगरसेविका उपस्थित होते. 

 पिसावें तलाव पुनजिवीत व सुशोभिकरणाचा लोकार्पण, कोयनावेळे व घोट या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील तळोजा नदीवरील पुलाचे लोकार्पण, खारघर सेक्टर-१९ मधील भूखंड क्र.१४ येथे प्रभाग कार्यालयाचे लोकार्पण, सेक्टर-३६ मधील भूखंड क्र. १३ येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र लोकार्पण, कळंबोली सेक्टर-०८ मधील सन शाईन सोसायटी पर्यंत काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण, सेक्टर-०८-ई मधील भूखंड क्र. ६, ७ व ८ येथील प्रभाग कार्यालयाचे लोकार्पण, कामोठे सेक्टर-११ मधील भूखंड क्र. १-बी येथील प्रभाग कार्यालयाचे लोकार्पण, नवीन पनवेल सेक्टर-१८ मधील भूखंड क्र. ८-अ, ८-ब या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या माता व बालसंगोपन केंद्राचे भूमिपूजन, पनवेल बसस्थानकामागे येथे प्रधानमंत्री आवास योजना व मुख्यमंत्री आवास योजनेतंर्गत कुष्ठरोग पिडीतांसाठी व खुल्या विक्रीसाठी प्रस्तावित गृह प्रकल्पाचे भूमिपूजन, तक्का येथे डोमिनोज समोरील मोकळी जागा येथे कोळी समाजाचे शिल्पचे लोकार्पण,  पनवेल महानगरपालिका हद्दीतील लायन्स गार्डन ते पी.डब्ल्यू.डी. ऑफीस ते जुने कोर्ट ते बंदर नाका काँक्रीटीकरण रस्त्याचे भूमिपूजन, लोकनेते दि.बा. पाटील शाळा येथे लोकनेते दि. बा. पाटील यांच्याबद्दल माहिती दर्शविणारे म्युरल व सुशोभित कक्षाचे लोकार्पण, प्रभाग समिती- ड येथील भूखंडावर व्यावसायिक दुकाने बहुमजली वाहनतळाच्या कामाचे भूमिपूजन झाले. 

     प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन करताना सांगितले कि, पूर्वी नगरपरिषद असलेल्या पनवेलचा महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर या भागाचा विकास व्हावा, ही लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची नेहमीच तळमळ राहिली आहे. पनवेल महापालिकेच्या निर्मितीपासून ते तिच्या वाढीपर्यंत मी साक्षीदार आहे. महापालिकेच्या स्थापनेपासूनच पनवेलच्या विकासकामांसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा सातत्यपूर्ण आग्रह राहिला असल्याचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी अधोरेखित केले.  द्रष्टे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून महापालिकेला बळ देण्याचे काम सुरू असून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. आज या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन होत असताना पनवेलमध्ये आश्वासक कार्य झाल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे त्यांनी नमूद केले. पनवेल महापालिकेची भव्य प्रशासकीय इमारत कोकण व मुंबईचे प्रवेशद्वार ठरत आहे. १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय पूर्णत्वास गेले आहे.  माता-भगिनींसाठी सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येत आहे. वैद्यकीय सुविधांच्या विस्तारासाठी आमदार प्रशांत ठाकूर हे नेहमीच आग्रही राहिले आहेत. महापालिकेच्या शाळा सुसज्ज व दर्जेदार असून लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून सिडकोकडून ३४१ भूखंड महापालिकेकडे वर्ग करण्यात आले असून याचा मोठा फायदा महापालिकेला झाला आहे. नव्याने स्थापन झालेली महापालिका असली तरी पनवेलमध्ये विकासाचे पर्व कायम राहणार असून स्पष्ट विचारधारा व दूरदृष्टी ठेवून काम सुरू आहे. अल्पावधीतच पनवेल महापालिकेने नागरिकांना केंद्रबिंदू मानून प्रभावी कामगिरी केली आहे. गतिमान, प्रगतिवान आणि आधुनिकीकरणाच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर व व्यासपीठावरील सर्वांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच पनवेल महापालिका ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गात जाईल, असा विश्वासही प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

       आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे स्वागत व आभार व्यक्त केले. त्यांनी पुढे म्हंटले कि, आपले शहर मोठे आणि सक्षम व्हावे हि प्रत्येकाची भावना असते. आणि त्या अनुषंगाने महानगरपालिका कायम प्रयत्नशील राहिली आहे. त्यामुळे झपाट्याने विकासाची गंगा आली. ग्रामीण भागाला विशेषतः २९ गावांचा समावेश महापालिकेत झाला त्या ग्रामीण भागाला प्रथम सुविधा दिल्या पाहिजेत यासाठी काम झाले. आमदार म्हणून न्हावा शेवा टप्पा ३ कामाचा पाठपुरावा सुरु केला आणि त्यानुसार फेब्रुवारी २०२६ ला हे काम पूर्ण होणार असून त्यामुळे मुबलक आणि नियमित पाणी मिळणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर शिलार धरणातून पनवेलला पाणी उपलब्धता होणार आहे  त्याबद्दल गणेश देशमुख व मंगेश चितळे यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. खारघर टोल चा प्रश्न होता तेव्हा देवेंद्रजी प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोल माफी करण्याचे आश्वासन मला दिले आणि त्यांनी तो शब्द खरा केला. सिडकोकडे अनेक भूखंड होते ते मी अध्यक्ष असताना महापालिकेला वर्ग करून परत मिळवता आले. मैदाने, बगीचे,आरोग्य केंद्रे, अशीही अनेक कामे मार्गी लागली विशेष म्हणजे सर्वात जास्त आरोग्य केंद्र असलेली पनवेल महानगरपालिका ठरली आहे. महापालिकेला विकासाचे रूप मिळाले आणि ते रूप प्रत्यक्षपणे साकार होत आहे. आणि पुढील काळातही हा ओघ सुरूच राहणार आहे.  महानगरपालिकेला विकासाचे ठोस स्वरूप मिळाले असून तो विकास प्रत्यक्षात साकार होत आहे. पुढील काळातही हा विकासाचा प्रवाह सुरूच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेलचे नाव जागतिक नकाशावर झळकले आहे. जनतेने वेळोवेळी दिलेल्या आशीर्वादांमुळेच हे शक्य झाले असून पुढेही हेच पाठबळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पनवेल महानगरपालिकेने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आयुक्त मंगेश चितळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. आमदार विक्रांत पाटील यांचेही यावेळी भाषण झाले, प्रास्ताविक आयुक्त मंगेश चितळे यांनी केले, त्यांनी विकासकामांच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.