Press "Enter" to skip to content

दिल्ली शंखनाद महोत्सवात ‘शौर्य’ व ‘श्रद्धा’ यांचा अद्भुत संगम!

मंगल पांडेंची बंदूक, पानीपत युद्धातील तोफ प्रथमच दिल्लीत… दुर्मिळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश आणि रामसेतूची दिव्य रामशिळा यांचे दर्शन!

नवी दिल्ली - भारताच्या इतिहासातील ‘भक्ती’ आणि ‘शक्ति’ यांचा संगम घडवणारा एक अद्वितीय सोहळा देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये साकारत आहे. ‘सेव्ह कल्चर, सेव्ह भारत फाउंडेशन’ प्रस्तुत आणि ‘सनातन संस्था’ आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ दिनांक १३ ते १५ डिसेंबर, भारत मंडपम्, नवी दिल्ली येथे होत आहे. या भव्य महोत्सवात १८५७ च्या पहिल्या बंडातील आद्यक्रांतीकारी मंगल पांडे यांनी वापरलेली बंदूक आणि मध्य प्रदेशच्या राजघराण्यातील मल्हारराव होळकर, तसेच क्रांतीसिंह नाना पाटील यांनी वापरलेल्या बंदूका प्रथमच दिल्लीकरांसमोर येणार आहेत. पानीपतच्या युद्धातील तोफा यांसह १५०० दुर्मिळ शस्त्रे पाहायला मिळणार आहेत. या महोत्सवात पराक्रमाचा तेजस्वी इतिहास आणि चैतन्यदायी अध्यात्माचा अद्भुत संयोग अनुभवायला मिळणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिली.

‘स्वराज्याचा शौर्यनाद’ : शिवकालीन शस्त्रांचे दुर्मिळ प्रदर्शन :
या महोत्सवातील ‘स्वराज्याचा शौर्यनाद’ प्रदर्शनीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील १५०० हून अधिक ऐतिहासिक शस्त्रांचा भव्य संग्रह प्रथमच दिल्लीकरांसमोर उलगडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः स्पर्श करून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना दिलेली तलवार, ढाळ, दांडपट्टा, कट्यार, बंदूक, २ तोफा; बालक आणि स्त्रिया यांच्या रक्षणासाठीची शस्त्रे यांचाही समावेश आहे. तसेच महाराणा प्रताप आणि विजयनगर साम्राज्यकालीन शस्त्रेही येथे पहाता येतील. हे केवळ शस्त्रांचे प्रदर्शन नसून लहान मुलांना यातून प्रेरणा मिळावी, म्हणून काही शस्त्रे हाताळण्यासाठी दिली जाणार आहेत, हे या प्रदर्शाचे वैशिष्ट्य आहे. तसेच तोफ कशी उडवली जाते, याचे प्रात्याक्षिक दाखवले जाणार आहे. हे शस्त्रप्रदर्शन ‘हॉल क्रमांक १२’ मध्ये सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील.

१ सहस्र वर्षांनंतर सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य दर्शन !
या महोत्सवात १ सहस्र वर्षांहून अधिक काळ जपलेल्या मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या अवशेषांचे दर्शन प्रथमच सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. गझनीच्या महंमदाने उद्ध्वस्त केलेल्या हे पवित्र अवशेष पुजारी कुटुंबाने तमिळनाडूत सुरक्षित ठेवले असून, कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य यांच्या मार्गदर्शनाने सनातन संस्थेमार्फत प्रदर्शित होणार आहेत. तसेच प्रभू श्रीरामांनी बांधलेल्या रामसेतूच्या अवशेषांपैकी रामशिळा (पाण्यावर तरंगणारे दगड) हे देखील येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा‘च्या माध्यमातून राष्ट्ररक्षण, संस्कृती, शौर्य व हिंदवी स्वराज्याचे तेज चेतविण्याचा प्रयत्न आहे. हे प्रदर्शन पहाण्यासाठी लहान मुलांसह युवापिढीला पालकांना अवश्य घेऊन यावे, असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे. हा महोत्सव SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळावर लाइव्ह पहाता येईल.
More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.