
पनवेल दि.०६ (वार्ताहर) : पनवेल शहरातील सिद्धी विश्वास देशमुख हिने तिच्या कलेच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरील सर्वात प्रतिष्ठित रिअॅलिटी शो ‘इंडियाज गॉट टॅलेंट – सीझन इलेव्हन’ यामध्ये परफॉर्म करणार आहे. द्रोण आर्चरी अकादमीच्या तिच्या सहकाऱ्यांसह सिद्धीने दिलेला थरारक आणि अद्वितीय परफॉर्मन्स आता संपूर्ण देश पाहणार असून, याचा प्रत्येक पनवेलकराला अभिमान वाटत आहे.
द्रोण आर्चरी अकादमीची टीम देशातील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये उत्तुंग कामगिरी करत आली असून, त्यांच्या अभिनव शैलीतील ‘आर्चरी परफॉर्मन्स आर्ट’ ने देशभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या टीममध्ये सिद्धीचे योगदान विशेष उल्लेखनीय असून, तिच्या नेमबाजीतील अचूकता, आत्मविश्वास व मंचावरील उपस्थिती खरोखर प्रेरणादायी आहे. इंडियाज गॉट टॅलेंटच्या परीक्षकांनी देखील त्यांच्या परफॉर्मन्सची दाद देत त्यांचे कौतुक केले आहे. पनवेलच्या मातीतून उगवलेल्या या लहानग्या कलाकाराने राष्ट्रीय पातळीवर मिळवलेली ही संधी केवळ तिच्यासाठीच नाही, तर पनवेल शहरासाठीही मोठा सन्मान आहे.
सिद्धीच्या यशामागे तिच्या पालकांचे, प्रशिक्षकांचे आणि संपूर्ण अकादमीचे कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण मार्गदर्शन आहे. या शनिवार आणि रविवारी रात्री ९:३० वाजता, सोनी टीव्ही आणि Sony LIV App वर सिद्धी आणि तिच्या टीमचा परफॉर्मन्स प्रसारित केला जाणार आहे. शहरातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि क्रीडाप्रेमी यांनी सिद्धीला भरभरून शुभेच्छा दिल्या असून, सर्वांनी हा अप्रतिम प्रदर्शनाचा क्षण नक्की पाहावा, असे पालकांनकडून आवाहन करण्यात आले आहे.





Be First to Comment