
वाघबीळच्या भूमिपुत्रांचा एल्गार; ‘आनंद नगर’चा फलक हटवून ‘आई एकवीरा देवी’ नाव द्या, अन्यथा तीव्र आंदोलन
ठाणे : सतिश पाटील
घोडबंदर रोडवरील वाघबीळ-कावेसर परिसरातील एका आरक्षित मैदानाचे नाव बदलण्यावरून आता स्थानिक भूमिपुत्र आणि प्रशासन यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. महासभेत अधिकृत ठराव मंजूर झालेला असतानाही, महापालिकेने स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना डावलून सदर मैदानाला ‘आनंद नगर क्रीडा संकुल’ असे नाव दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नेमके प्रकरण काय ?
कावेसर येथील प्रभाग क्र. १ मधील स्वस्तिक गृहसंकुलासमोरील पीजी-५ या मैदानाचे नामकरण “आई एकवीरा देवी मैदान” असे करण्याबाबतचा ठराव (क्रमांक ५५६) दिनांक २०/०१/२०२२ रोजी ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. स्थानिक नगरसेवक श्री. नरेश मणेरा यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला होता, ज्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली होती. मात्र, सध्या या मैदानाच्या प्रवेशद्वारावर ‘आनंद नगर खेळाचे मैदान’ असा फलक लावण्यात आला असून, त्यावर स्थानिक आमदारांच्या संकल्पनेचा उल्लेख आहे.
या प्रकाराविरोधात स्थानिक भूमिपुत्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि घोडबंदर रोड रहिवासी आता आक्रमक झाले आहेत. प्रशासनाने आपल्या चुकीची तातडीने दखल घेऊन मैदानाचे नाव अधिकृत ठरावाप्रमाणे “आई एकवीरा देवी मैदान” असे करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
जर पुढील चार दिवसांत प्रशासनाने यावर कार्यवाही केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि सध्याच्या चुकीच्या नावाच्या बोर्डवर काळे फासण्यात येईल, असा कडक इशारा स्थानिक भूमिपुत्रांनी दिला आहे. आता ठाणे महापालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Be First to Comment