
पनवेल स्टेशन परिसरात डुप्लिकेट नंबर प्लेट असलेली फॉर्च्युनर कार जप्त
पनवेल दि. ०३ ( वार्ताहर ) : पनवेल वाहतूक शाखेच्या दक्ष कारवाईत नवीन पनवेल रेल्वे स्टेशन (पूर्व) परिसरातून डुप्लिकेट नंबर प्लेट लावलेली संशयित फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आली असून, कारमध्ये पिस्तूलसदृश शस्त्र सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. चालकास अटक करून पुढील तपास खांदेश्वर पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.
पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस वाहतूक शाखेची टीम स्टेशन परिसरात वाहतूक नियमन करत असताना ही घटना उघडकीस आली. फॉर्च्युनर क्रमांक MH 03 AH 7863 हे वाहन अनधिकृतरित्या उभे असल्याचे दिसून आले. त्यानुसार वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी गाडीवर नोंद असलेल्या मालकाशी संपर्क साधण्यात आला. मात्र त्यांनी, “ही गाडी माझी नसून अज्ञात व्यक्ती माझ्या वाहनाचा क्रमांक वापरत आहे. याबाबत मी पूर्वीही तक्रारी केल्या आहेत,” अशी माहिती दिल्याने वाहतूक पोलिसांना संशय आला.
यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता समोरील दरवाजा अर्धवट उघडा आढळला. आत तपासणी केल्यावर पिस्तूलसदृश शस्त्र आढळून आले. पुढील पाहणीत राजेंद्र निकम या नावाचे ड्रायव्हिंग लायसन्सही मिळाले. कोर्ट चेकर अॅपमध्ये तपासणी केली असता निकम यांच्या विरोधात मुंबई विभागात विविध गुन्हे नोंद असल्याचे समोर आले. यावेळी अधिक अंमलदारांना बोलावण्यात आले. मुंबई येथून काही वेळानंतर राजेंद्र निकम हे स्वतः घटनास्थळी आले. वाहनावर डुप्लिकेट नंबर प्लेटचा वापर, अनधिकृत पार्किंग आणि वाहनातून शस्त्रसदृश वस्तू मिळाल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन टीमकडे सोपविण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने, एचसी येळे, मुलाणी, महेंद्र राजपूत, राकेश घाडगे, वाघमारे आणि पीएन केशव निकम यांनी संयुक्तपणे केली. नवीन पनवेल स्टेशन परिसरात वाहतूक पोलिसांनी केलेली ही तातडीची आणि अचूक कारवाईमुळे गुन्हेगारी कृत्य असू शकणारी गंभीर घटना उघडकीस आल्याने नागरिकांनी पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक केले आहे.





Be First to Comment