
“देह माझे भजन, तर शास्त्रीय संगीत माझा आत्मा”- पं. उमेश चौधरी
पनवेल (प्रतिनिधी) दत्तजयंतीनिमित्त आयोजित भक्तिमय कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार व गायक पं. उमेश चौधरी यांनी आपल्या सुमधूर गायनाने उपस्थितांचे मन मोहून टाकले. या प्रसंगी बोलताना त्यांनी, “देह माझे भजन, तर शास्त्रीय संगीत माझा आत्मा” असे मनोवेधक प्रतिपादन केले.
सदगुरु वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तळोजे मजकूर योगीनगर (धोंडळी) परिसरात दरवर्षीप्रमाणे भक्तिभाव आणि अध्यात्मिक उत्साहात ‘श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व श्री दत्तजयंती उत्सव’ आयोजित करण्यात आला. श्री नवनाथ सेवा मंडळ, योगीनगर (धोंडळी) यांच्या वतीने आयोजित हा उत्सव स्थानिक भक्तांसह संपूर्ण परिसरातील भाविकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.मुख्य आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. उमेश चौधरी यांचे शास्त्रीय गायन व अभंगवाणी सादर झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच प्रांगणात भक्तीभाव आणि संगीतरसिकांच्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पं. उमेश चौधरी यांनी विविध रचना सादर करत रसिकांना अद्वितीय संगीत अनुभव दिला. त्यांच्या सुमधुर गायनाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दत्तजयंतीच्या शुभवेलीत आयोजिलेला हा कार्यक्रम आध्यात्मिक उन्नती आणि संगीतसाधनेचा सुंदर संगम ठरला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महंत यशवंत महाराज यांची आशिर्वादपर प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही उपस्थिती दर्शविली.
पं. उमेश चौधरी यांच्या सुमधुर गायनाला अक्षय चौधरी आणि मंगेश चौधरी यांनी संगीत साथ दिली. तबल्यावर सुप्रसिद्ध तबलावादक प्रसाद पाध्ये, पखवाजावर ऍड. सूरज गोंधळी, हार्मोनियमवर सुप्रिया जोशी तर टाळ वाद्यावर गुरुदास कदम या अनुभवी कलाकारांची उत्तम साथ लाभली. सूत्रसंचालन व निवेदनाची जबाबदारी सोपान आडव यांनी प्रभावीपणे पार पाडली. पं. उमेश चौधरी यांनी गायनाची सुरुवात जयजयंवती रागातील बडा खयाल ‘ए माई ऐसे समेमे’ ने केली. त्यानंतर त्याच रागातील ‘मोरे मंदर अजहूनही आये’ हा छोटा खयाल सादर केला. पुढे ‘श्रीरामचंद्र कृपाळू भजु मन’ ही गोस्वामी तुलसीदासांनी रचलेली प्रसिद्ध रामस्तुती अभंगवाणी सादर केली. यानंतर ‘चंदनाची परिमळ’, ‘याहूनी मागणे काय दत्ता’, ‘नाचतो तव भजनी’, ‘हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा’ हे अभंग सादर झाले आणि ‘स्वामी कृपा कधी करणार’ या भैरवी रचनेने कार्यक्रमाची सांगता झाली.





Be First to Comment