
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर्वसामान्य माणसाचा विचार करणारे – आमदार प्रशांत ठाकूर
प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने महिलांना स्वयंरोजगारासाठी मोठा आधार
पनवेल (प्रतिनिधी) सर्वसामान्य माणसाचा विचार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी विविध योजना अंमलात आणल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व बहिणींनी कुटुंब आर्थिकदृष्ट्या सधन करण्यासाठी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे कौशल्य विकसित करावे, स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये पुढाकार घ्यावा आणि आर्थिक प्रगतीसाठी सक्रिय भूमिका बजवावी, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (दि. ०१) मार्केट यार्ड येथे केले.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आणि प्रयत्नातून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत घरघंटी व शिलाई मशीन वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला असून या योजनेअंतर्गत निवड झालेल्या ४ हजार २५० पात्र लाभार्थींना आजपासून शिलाई व घरघंटी मशीनचे वाटप योजनेचा शुभारंभ झाला. त्यावेळी आपल्या भाषणातून सर्व बहिणीशी संवाद साधताना बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमर देवेकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनिता ओव्हळ, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, अमित जाधव, पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, संयोजक संतोष पवार, ऍड. चेतन जाधव आदी उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना म्हंटले कि, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्यासाठी भावाप्रमाणे धावून आले आहेत. उज्वला योजना, शौचालय, मातृवंदन योजना, आरोग्य योजना, किसान सन्मान योजना, रेशन योजना, नमो सन्मान, प्रधानमंत्री आवास योजना, शैक्षणिक योजना, अशा विविध योजनांबरॊबरच लाडकी बहीण योजना अंमलात आणून त्या यशस्वीपणे सुरु आहेत. या योजनेतून हातभार लागत आहे आणि या जोडीने आज वाटप होत असलेल्या यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची उपलब्धी झाली असून त्यामधून आर्थिदृष्ट्या सर्व बहिणी सबळ होणार आहात. लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याचा संकल्प सरकारने केला आहे आणि त्याची अमंलबजावणी प्रगतीने सुरु आहे. आज तुम्हाला मिळाल्या शिलाई मशीन घरघंटीचा वापर स्वयंरोजगार म्हणून चांगल्या प्रकारे करा. या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही वापरलेल्या यंत्रसामुग्रीचे शासन पातळीवर सर्वेक्षण होणार आहे असे सांगून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून जो चांगल्या प्रकारे काम करतील स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावतील आणि रोजगार मोठा करतील अशा दहा बहिणींना स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या नावाने पुरस्कार देणार असल्याची घोषणाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. आपल्या परिसरात विमानतळ आला आहे आणि त्या अनुषंगाने हजारो कामगार आतमध्ये तर तेवढेच कामगार बाहेरही काम करणार आहेत. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टींची आवश्यकता लागणार आहे. येथील व्यवसाय दहा पटीने होणार आहे त्यामुळे आवश्यकता लक्षात घेऊन रोजगार वृद्धिंगत करता येणार आहे. सन २०२९ मध्ये लोकसभा निवडणुकीत तब्बल ३३ टक्के महिलांना आरक्षण मिळणार आहे त्यामुळे जवळपास १८१ महिला खासदार होणार आहेत, आणि अत्यंत चांगली बाब असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावून सर्व बहिणीसाठी योजना आणल्या आहेत, त्यामुळे सर्व बहिणींनी आपला आशीर्वाद त्यांना द्यावा, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. त्याचबरोबर हि योजना यशस्वी करण्यासाठी काम करणाऱ्या अधिकारी व सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानत त्यांना धन्यवाद दिले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष म्हणाले कि, महिला सक्षमीकरण व्हावे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे. महिला सबलीकरणासाठी रत्नाताई घरत आणि महिला पदाधिकारी सातत्याने विविध रोजगार प्रशिक्षण, कार्यशाळा उपक्रम राबवित आल्या आहेत. आणि त्यासाठी सतत योजनांचा मागोवा घ्यायच्या. त्यांनी अनेक महिलांना स्वयंरोजगार मिळवून दिला त्यांना पाठिंबा देण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. फक्त पनवेलच नाही तर संपूर्ण रायगडमध्ये त्यांना प्रशांतदादाच बोलतात. दादाच आमचे काम करू शकतो हि भावना प्रत्येकाच्या मनात आहे म्हणून लहानापासून थोरांपर्यंत त्यांना प्रशांतदादा म्हणून बोलतात. या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात असा यंत्रसामुग्री वाटपाचा कार्यक्रम कुठेच पाहायला मिळाला नाही. सर्व नियोजन केल्यानंतरच महिलांकडून अर्ज मागविण्यात आले. तुमच्यासाठी प्रशांतदादांनी नियोजन करून हा उपक्रम राबविला आहे. आणखी योजना मिळतील कारण तुमच्या हक्काचा दादा तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असे सांगतानाच महिला मोर्चाच्यावतीने विविध प्रशिक्षण दिले जातील, असेही त्यांनी यावेळी आश्वासित केले.
यावेळी राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनीही मार्गदर्शन केले. आपल्याला मिळालेल्या यंत्रसामुग्रीचे योग्य वापर करून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्तर उंचवा असे सांगून या उपक्रमातून एकप्रकारे चार हजार महिलांना रोजगार उपलब्ध झाला असल्याचे अधोरेखित केले. महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम यांनी आपल्या भाषणात महिलांच्या दृष्टिकोनातून हा स्वप्नपूर्ती सोहळा असल्याचे सांगून दमदार आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वयंरोजगाराचे प्रत्यक्षात स्वप्न साकार केल्याचे सांगितले.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेला हा उपक्रम पनवेल मतदारसंघातील घरगुती उद्योगांना नवी दिशा देणारा ठरत आहे. महिलांच्या हाती रोजगाराचे साधन दिल्यास त्यांच्या कुटुंबाच्या उन्नतीपासून समाजाच्या प्रगतीपर्यंत मोठा सकारात्मक बदल घडतो. त्याची जाणीव ठेवूनच आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संबंधित प्रशासनाशी सतत पाठपुरावा केला.या उपक्रमासाठी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला. योजना पारदर्शक राहावी यासाठी इच्छुक महिलांकडून घरघंटी किंवा शिलाई मशीनसाठी अर्ज मागविण्यात आले. या अर्जांची व कागदपत्रांची शासकीय निकषांनुसार पडताळणी करण्यात आली आणि नियमांनुसार पात्र ठरलेल्या महिलांना मशीन आणि प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून पनवेल मतदारसंघातील महिलांच्या आर्थिक प्रगतीस चालना देणारे आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून महिला सक्षमीकरणाचा प्रभावी मार्ग अधिक व्यापक झाला आहे. त्यामुळे महिलांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यापुढील टप्प्यातही हा प्रकल्प राबविण्यात येणार असून इच्छुक महिलांनी नोंदणी केल्यास आगामी आर्थिक वर्षात उपलब्ध होणाऱ्या निधीतून त्यांना लाभ मिळू शकणार आहे.





Be First to Comment