

पेणकरांनी प्रस्थापितांच्या हुकूमशाहीला तडीपार करावे- शिशिर धारकर
पेण, ता. ३० (वार्ताहर) : पेण नगरपालिका निवडणुका आल्यावरच विरोधक अर्बन बँकेचा प्रश्न उपस्थित करतात परंतु बँक बाबतचा खरा इतिहास मीच सांगू शकत असून गेल्या दहा वर्ष यामुळेच सत्ता भोगत असलेल्या विरोधकांनी शहराला भकास करून स्वतःच्या कुटुंबाचा विकास करणाऱ्या प्रस्थापितांच्या हुकुमशाहीला आता पेणकरांनी तडीपार करावे असे नम्रतेचे आवाहन आम्ही पेणकर विकास आघाडीचे सर्वेसर्वा माजी नगराध्यक्ष शिशीर धारकर यांनी केले आहे.
आम्ही पेणकर विकास आघाडीच्या थेट नगराध्यक्ष रिया धारकर व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा दि.२९ रोजी रात्री महात्मा गांधी वाचनालय येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेला आघाडीचे अध्यक्ष शिशिर धारकर, शिवसेना ठाकरे गट जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, शेकाप ज्येष्ठ नेते पी.डी.पाटील, जिल्हा संघटक ॲड.रोशन पाटील, माजी नगरसेवक रघुनाथ बोरेकर, शिवसेना महिला आघाडी दीपश्री पोटफोडे, उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, तालुकाप्रमुख समीर म्हात्रे आदिंसह मोठ्या प्रमाणावर शहरातील नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी धारकर यांनी पुढे सांगितले शहरातील जनता अशुद्ध पाणी पीत असून रस्ते, लाईट, गटारे, नाट्यगृहाची अवस्था, रखडलेली अंडरग्राउंड विद्युत पुरवठा, भाजी मार्केट, मच्छी मार्केट, पार्किंग व्यवस्था यासह आपल्या फायद्यासाठी वाढवलेली घरपट्टी तसेच असे शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे यांनी शहराचा विकास नाही तर भकास केला असून यांच्याकडे कोणताच डेव्हलपिंग प्लॅन नसल्याने ते फक्त आपल्या कुटुंबाचाच विकास करत असल्याचा घणाघात शिशिर धारकर यांनी आमदार रवीशेठ पाटील पाटील यांच्यावर केला आहे.तर माझ्या वडिलांपासून आत्तापर्यंत आम्ही पेण शहरात कधीही राजकारण केले नाही आघाडीच्या माध्यमातूनच आपण पेणकरांसाठी लढत राहिलो त्यामुळे सत्ता येताच शहरातील सर्व समस्या सोडविल्या जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित जनतेला दिले आहे.या प्रचार सभेमध्ये एलईडीच्या माध्यमातून शहरातील विविध समस्यांची चित्रफीत दाखवत शिशिर धारकर यांनी जनतेसमोर प्रस्थापितांचे पितळ उघडे केले.यावेळी आम्ही पेणकर विकास आघाडीसह समविचारी पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी थेट नगराध्यक्षासह नगरसेवक पदाकरीता उभ्या असणाऱ्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.





Be First to Comment