
‘श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व श्री दत्तजयंती उत्सव’
पनवेल (प्रतिनिधी) सदगुरु वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तळोजे मजकूर योगीनगर (धोंडळी) परिसरात दरवर्षी प्रमाणे भक्तिभाव आणि अध्यात्मिक उत्साहात ‘श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व श्री दत्तजयंती उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. श्री नवनाथ सेवा मंडळ योगीनगर (धोंडळी) यांच्यावतीने आयोजित हा उत्सव स्थानिक भक्तांसह संपूर्ण परिसरातील भाविकांसाठी अनन्यसाधारण आकर्षण ठरत आहे.
या वर्षीच्या महोत्सवात शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी संगीत, अध्यात्म, भजन आणि प्रवचनांनी युक्त एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्याचा मुख्य आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. उमेश चौधरी यांचे शास्त्रीय गायन व अभंगवाणी सादर होणार आहे. श्री स्वामी समर्थ मठ मंदिराच्या भव्य प्रांगणात संध्याकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा सांगीतिक सोहळा रंगणार आहे.पं. उमेश चौधरी यांच्या सुमधुर गायनाला तबल्यावर प्रसाद पाध्ये, पखवाजावर ऍड. सूरज गोंधळी, हार्मोनियमवर सुप्रिया जोशी, तर टाळ वाद्यावर गुरुदास कदम अशी अनुभवी कलाकारांची प्रभावी साथ लाभणार आहे. कार्यक्रमातील सूत्रसंचालन व निवेदनाची जबाबदारी सोपान आडव सांभाळणार आहेत. या संगीत कार्यक्रमापूर्वी वातावरण अधिक अध्यात्मिक करणारे दोन विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये सायंकाळी ४ वाजता ह.भ.प. निवृत्ती महाराज यांचे प्रवचन तर सायंकाळी ५ वाजता बालगोपाल हरिपाठ मंडळ, घोट यांचा हरिपाठ कार्यक्रम होणार आहे. या उत्सवानिमित्त श्री नवनाथ सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भाविकांच्या मोठ्या उपस्थितीचा विचार करून मंदिर परिसरात आवश्यक त्या सर्व सुविधा, प्रकाशयोजना, ध्वनीव्यवस्था तसेच दर्शन व्यवस्थेची उत्तम तयारी केली आहे.





Be First to Comment