Press "Enter" to skip to content

राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे १२ वे पर्व; महाअंतिम फेरी पनवेलमध्ये

ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनिल बर्वे यांचा ‘गौरव रंगभूमीचा’ पुरस्काराने होणार सन्मान 
         

सिने नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची लाभणार मांदियाळी 
–  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी दिली माहिती 

पनवेल (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा ‘अटलकरंडक’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्षी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सव वर्ष असून या महत्वपूर्ण वर्षानिमित्त यंदा दोन रंगकर्मीचा ‘गौरव रंगभूमीचा’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील तसेच रंगभूमीवरील एक अत्यंत मान्यवर, अनुभवी अभिनेत्री ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि रंगभूमी व सिनेक्षेत्रातील लोकप्रिय कलाकार सुनिल बर्वे यांना यंदाच्या ‘गौरव रंगभूमीचा’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आज (दि. २८ नोव्हेंबर) खांदा कॉलनी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

      श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे १२ वे वर्ष असून त्या संदर्भात विस्तृत माहिती देण्यासाठी खांदा कॉलनी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ अभिनेते व स्पर्धा समितीचे सदस्य जयवंत वाडकर, स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर सुप्रसिद्ध मालिका व सिने अभिनेते सुव्रत जोशी, भाजपचे नविन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, कार्यवाह श्यामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, अमोल खेर, गणेश जगताप, वैभव बुवा आदी उपस्थित होते. 

         प्रसार माध्यमांना पुढे माहिती देताना उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी सांगितले कि, पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात दिनांक ०५, ०६ आणि ०७ डिसेंबर पर्यंत या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. यामध्ये राज्यभरातून प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या अंतिम २५ एकांकिका सादर होणार आहेत. या अनुषंगाने पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव केंद्राच्या प्राथमिक फेरी पार पडली असून रायगड, ठाणे, मुंबई केंद्राची प्राथिमक फेरी बुधवारपासून सुरु झाली आहे ती फेरी ३० नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. महाअंतिम फेरीचे उदघाटन ०५ डिसेंबर तर पारितोषिक वितरण सोहळा ०७ डिसेंबरला मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. ‘गौरव रंगभूमीचा’ पुरस्काराने यापूर्वी ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश बुद्धीसागर, जयवंत सावरकर, डॉ. मोहन आगाशे, सतिश पुळेकर यांना सन्मानित करण्यात आले असून यावर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी व सुप्रसिद्ध अभिनेते सुनिल बर्वे यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.  मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील तसेच रंगभूमीवरील एक अत्यंत मान्यवर, अनुभवी अभिनेत्री नीना कुलकर्णी आहेत. नाटक, चित्रपट, दूरदर्शन आणि वेब सिरीज या सर्व माध्यमांत त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. सुनिल बर्वे हे  सुद्धा मराठी रंगभूमी, दूरदर्शन व चित्रपट क्षेत्रातील एक लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांची साधी-सरळ भूमिका ते विनोदी, गंभीर, भावनिक अशा विविध प्रकारच्या भूमिका सहजतेने साकारतात म्हणून ते प्रेक्षकांमध्ये विशेष प्रिय आहेत. त्यामुळे त्यांना पुरस्कार जाहीर करताना खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी परेश ठाकूर यांनी व्यक्त केली.  त्यांना प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि प्रत्येकी ५० हजार रुपये असे आहे. तसेच महाअंतिम फेरीचे परीक्षण रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट क्षेत्रातील अत्यंत मान्यवर कलाकार म्हणून ओळखले जाणारे आणि सशक्त अभिनयशैली, दमदार आवाज आणि भावपूर्ण मुखअभिनय यामुळे ते प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक तसेच मराठी टीव्ही आणि रंगभूमीवरील अभिनेत्री व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे अनुभवी अभिनेते सुनील तावडे हे करणार आहेत. त्यात आणखी विशेष म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेते, दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री त्यांच्या खास शैलीत बहारदार सूत्रसंचालन करणार आहेत. तसेच बक्षिस वितरण सोहळ्याच्या दिवशी हास्यजत्रा फेम अरुण कदम, श्याम राजपूत व चेतना भट यांचा मनोरंजनात्मक कार्यक्रमही होणार आहे. तसेच हास्य सम्राट विजेते प्रा. दीपक देशपांडे हे सुद्धा आपली विनोदी कला सादर करणार आहेत, अशीही माहिती त्यांनी देत या वर्षी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय अटल करंडक  बहारदार सोहळ्याने अधिक विशेष असणार आहे, त्यामुळे या अटल करंडकाचा जास्तीत जास्त नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी पत्रकार परिषेदच्या माध्यमातून केले. 

        या एकांकिका स्पर्धेत राज्यभरातून १०० हुन अधिक एकांकिकांचा सहभाग असतो. नवनवीन संकल्पना आणि  दर्जेदार एकांकिका सादर होत असल्याने हा करंडक महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध झाला आहे. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत स्पर्धेचा आवाका वाढत आहे.  सांस्कृतिक कट्टा राज्यभर पसरला असून या क्षेत्रातून कलाकारांना संधी देण्याचा प्रयत्न होत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. तसेच अंतिम फेरीचे परिक्षण नाट्य सिने क्षेत्रातील नामवंत कलाकारांच्या नजरेतून होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. त्याचबरोबरीने स्पर्धेचा ब्रँड अँबेसिडर आणि स्पर्धेचे स्वतःचे शीर्षक गीत असलेली हि महाराष्ट्रातील एकमेव एकांकिका स्पर्धा असून यंदाच्या स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर सुप्रसिद्ध मालिका व सिने अभिनेते सुव्रत जोशी असल्याचे सांगण्यात आले.  या स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक टीआयपीएल, सहप्रायोजक निल ग्रुप तर मिडिया प्रायोजक सन मराठी आणि टीआरपी मराठी हे सोशल मीडिया प्रायोजक आहेत, अशी माहिती कार्यवाह श्यामनाथ पुंडे यांनी यावेळी दिली. 

अटल करंडक हि स्पर्धा महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली आहे. हि स्पर्धा दर्जेदार आहे. अशाच स्पर्धेतून आम्ही पुढे आलो आहोत. कलाकारांना वाव देण्याचे काम यातून होत आहे. नव्या पिढीकडे टॅलेंट आणि व्हिजन आहे. महाविद्यालयाच्या थिएटरला अनन्य साधारण महत्व आहे. आणि या स्पर्धेतून दर्जेदार कलाकारांची निर्मिती होत असते त्यामुळे अटल करंडक कलाकारांसाठी मोठे व्यासपीठ आहे.

– ज्येष्ठ कलाकार जयवंत वाडकर

एकांकिकेत वाहवा मिळाल्यानंतर पुढील दिशा मिळत असते. मी सुद्धा एकांकिकांमधून सादर झालो आहे. यश अपयश याची चिंता करायची नाही आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा असतो. अटल करंडकमध्ये वयाचे बंधन नाही त्यामुळे प्रत्येकाला संधी असून हा प्लॅटफॉर्म महत्वाचा आहे. त्यामुळे अटल करंडकशी जोडलो गेलो याचा मला आनंद आहे. एकांकिकेतून सकारात्मक जाणिव निर्माण होते. नाटकाचे व्यासपीठ बळ देते आणि निरोगी समाज निर्माण करण्याचे काम एकांकिका करते त्यामुळे एकांकिका सकारात्मक कलाविष्कार आणि प्रेरणा देणारे आहे.

– सुप्रसिद्ध मालिका व सिने अभिनेते सुव्रत जोशी 
नाटय चळवळ वॄद्धींगत करण्यासाठी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी "रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा" हे ब्रीदवाक्य घेऊन ‘अटलकरंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाटयरसिकांच्या गळयातील ताईत बनली असून या स्पर्धेने नाट्यविश्वात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. 

अशी आहेत पारितोषिके :

प्रथम क्रमांक- ०१ लाख रूपये, प्रमाणपत्र आणि मानाचा अटलकरंडक

द्वितीय क्रमांक- ७५ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह

 तॄतीय क्रमांक- ५० हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह

 उत्तेजनार्थ दोन बक्षिसे – प्रत्येकी १० हजार रुपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह 

लक्षवेधी एकांकिका- ३० हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह 

विनोदी एकांकिका – २० हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह 

             – वैयक्तिक पारितोषिके –

 सर्वोत्कॄष्ठ- दिग्दर्शक/  अभिनेता/ अभिनेत्री/ लेखक/ नेपथ्य / प्रकाश योजना/ संगीत 

प्रथम क्रमांक- ०३ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह

द्वितीय क्रमांक- ०२ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह

 तॄतीय क्रमांक- ०१ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह

उत्तेजनार्थ – ५०० रुपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह

—————————————————————–

उत्कृष्ट वेशभूषा (कै. किशोर जोशी यांच्या स्मरणार्थ)- ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह  

अतुल परचुरे सर्वोकृष्ठ विनोदी कलाकार – ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह  

उत्कृष्ट बालकलाकार – ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह  

———————————————–

प्रत्येक केंद्रावरील सर्वोत्कृष्ट एकांकिका 

प्रथम क्रमांक – ०७ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह 

द्वितीय क्रमांक – ०५ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह 

———————————————————————————————————-

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.