Press "Enter" to skip to content

नवीन दिवाणी न्यायाधीश इमारतीवरील दोन मजल्यांच्या प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात  

आमदार प्रशांत ठाकूर, ऍड. पारिजात पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऍड. मनोज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पनवेल वकील संघटनेच्या पाठपुराव्याला यश 

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल येथील नवीन दिवाणी न्यायाधीश न्यायालयीन इमारतीवर दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असून 

 यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष ऍड. पारिजात पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऍड. मनोज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पनवेल वकील संघटनेचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कामी आला आहे. या बांधकामासाठी १० कोटी १६ लाख ५७ हजार ८९४ रुपये खर्च केले जाणार आहेत.             पनवेल मधील नवीन कोर्ट इमारतीवर दोन मजले बांधण्याकरिता निधीची तरतूद करण्याची आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती तसेच या संदर्भात त्यांनी व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष ऍड. पारिजात पांडे आणि पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष एड. मनोज भुजबळ आणि सहकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या प्रयत्नांना यश आले असून याचा वकील, पक्षकार, नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. 

           पनवेल येथील नवीन इमारतीमध्ये सह दिवाणी न्यायालय व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पनवेल हे सहा कोर्ट तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर हे चार कोर्ट, जिल्हा व अति सत्र न्यायालय चार कोर्ट, तसेच पोस्को न्यायालय एक असे एकूण १५ न्यायालये आहेत. परंतु नवीन कोर्टामध्ये तळमजला अधिक एक मजला असे एकूण प्रत्यक्षात आठ कोर्ट हॉल असून त्यामध्ये सद्यस्थितीत दाटीवाटीने १५ कोर्ट कार्यान्वित असून सात न्यायालयांना रितसर कोर्ट हॉल उपलब्ध नाही. आणि त्याकरीता नवीन इमारतीमध्ये असलेली वकीलांची लायब्ररी तसेच कॅटींगमध्ये सिव्हिल प्रीझोनमध्ये कोर्ट बसवण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. पनवेल न्यायालयाकरिता मंजूर न्यायाधीश, वकील व न्यायालयात येणारे पक्षकार यांच्या तुलनेने सध्याची इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या सर्वाना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल वकील संघटनेच्या सोबतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देत न्यायालय इमारतीवर दोन मजले बांधकामासाठी जास्तीत जास्त आर्थिक निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती, त्यानुसार राज्य शासनाने या कामासाठी खर्चाच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा जाहीर होऊन सदरच्या कामाचा ठेका उल्हासनगर येथील रचना कंट्रक्शन या कंपनीला मिळाला आहे. आता या  कामाची प्रत्यक्ष सुरुवात होणार असून एक वर्ष कालावधीत हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे दोन मजली विस्ताराचे काम मार्गी लागणार असून पनवेल परिसरातील न्यायालयीन कामकाज अधिक सुलभ, सुटसुटीत व सर्वसमावेशक होणार आहे.

 

पनवेल न्यायालयाच्या वाढत्या कामकाजाला न्याय देण्यासाठी अतिरिक्त मजल्यांची अत्यंत गरज होती. या कामाला येत्या महिन्यात सुरुवात होणार असून ते पनवेल वकील संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. पारिजात पांडे यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे हा महत्त्वाचा टप्पा गाठता आला. दोन नवीन मजल्यांमुळे न्यायालयीन प्रक्रिया अधिक सुलभ, सुटसुटीत होणार असून वकील, न्यायाधीश आणि पक्षकारांना मोठा दिलासा मिळणार आहे.यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रशांत ठाकूर, बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. पारिजात पांडे, पनवेल वकील संघटनेचे सहकारी यांचे मनापासून आभार मानतो.          

ऍड. मनोज भुजबळ, अध्यक्ष- पनवेल वकील संघटना 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.