
पनवेल वकील संघटना निवडणूक ; अकरा जागांसाठी २५ नामनिर्देशनपत्र दाखल, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी मतदान
पनवेल (प्रतिनिधी) न्यायालयीन कामकाजात वकील, अशील, कर्मचारी आणि न्यायालयात उद्भवणारे प्रश्न तसेच समस्या सोडवण्यासाठी काम करीत असलेली पनवेल वकील संघटना म्हणजेच पनवेल बार असोसिएशनच्या व्यवस्थापन समितीच्या “जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२८’’ या कालावधीसाठी त्रैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. शनिवारी २९ नोव्हेंबर २०२५ रोजी पनवेल दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीमधील वकील (बाररूम) दालनात मतदान होणार असून त्याच दिवशी त्याच ठिकाणी सायंकाळी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सह सचिव (महिला राखीव), खजिनदार, ऑडिटर, सहखजिनदार प्रत्येकी एक तर दोन महिला राखीव कार्यकारिणी सदस्य तसेच दोन सर्वसाधारण कार्यकारिणी सदस्य अशी एकूण अकरा पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात येणार आहे. संघटनेच्या नोंदणीकृत १५८५ वकील सभासदांच्या पैकी ११६३ मतदार उमेदवारांना मतदान करणार आहेत. निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जेष्ठ वकील ॲड. एच. जे. शेळके यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून पनवेल बार असोसिएशनच्या वतीने नेमणूक करण्यात आली आहे.
अकरा जागांसाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीत २५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून यापैकी सात महिलांनी प्रतिनिधित्व सिद्ध करण्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. अध्यक्ष पदासाठी ॲड. मनोज कृष्णाजी भुजबळ आणि ॲड. रत्नदीप राम पाटील, उपाध्यक्ष पदासाठी ॲड. संतोष जोमा म्हात्रे तसेच ॲड. सचिन अंबाजी म्हात्रे, सचिव पदासाठी ॲड. प्रल्हाद घनश्याम खोपकर आणि ॲड. नित्यानंद राम ठाकूर, सहसचिव ( महिला राखीव ) पदासाठी ॲड. हेमा सिताराम भगत आणि ॲड. दिपाली रामदास गावंड, खजिनदार पदासाठी ॲड. धनराज कान्हा तोकडे आणि ॲड. महेबूब गैबी पटेल, सहखजिनदार पदासाठी ॲड. विशाल लक्ष्मण डोंगरे आणि ॲड. हेमंत गंगाधर शिंदे तसेच ॲड. रोहिदास हरी आगलावे, ऑडिटर पदासाठी ॲड. भूषण मोरेश्वर म्हात्रे आणि ॲड. भास्कर रामचंद्र पाटील कार्यकारिणी सदस्य पदासाठी ॲड. विजयेंद्र नारायण मुंढे, ॲड. इर्शाद रमझान शेख, ॲड. आशिष विजय पनवेलकर, ॲड. जयसिंग जगन्नाथ शेरे, ॲड. नागेश अरविंद हिरवे तथा कार्यकारिणी सदस्य (महिला राखीव) पदासाठी ॲड. ज्योती पी. राऊत – उरणकर, ॲड. समीना साजिद खान, ॲड. दिपाली रवींद्र बोहरा, ॲड. छाया रामदास म्हात्रे, ॲड. आस्मिता नंदकिशोर भुवड यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव ( महिला राखीव), खजिनदार, ऑडिटर या पदांसाठी प्रत्येही दोन उमेदवार असल्याने यांच्यात सरळ लढत होणार असून सहखजिनदार पदासाठी तिहेरी लढत होणार आहे. त्याचप्रमाणे दोन कार्यकारिणी सदस्य आणि दोन महिला राखीव कार्यकारिणी सदस्यपदांसाठी अनुक्रमे पाच पाच उमेदवार रिंगणात आहेत.



Be First to Comment