Press "Enter" to skip to content

अत्याधुनिक ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ प्रयोगशाळेचे उद्‌घाटन

मॉडर्न स्कूल वाशीमध्ये रयत शिक्षण संस्थेची मुख्याध्यापक व लेखनिक कार्यशाळा उत्साहात 

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती 

पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्था सातारा आणि रायगड विभाग कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुख्याध्यापक व लेखनिक २०२५-२६ कार्यशाळा आज (दि. २४) वाशी येथील मॉडर्न स्कूलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि व्यवस्थापन कौशल्यवृद्धीच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.

कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सचिव विकास देशमुख, उपाध्यक्ष जयश्रीताई चौगुले, डॉ. राजेंद्र मोरे, माजी सचिव व महात्मा फुले पनवेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, ज्योत्स्ना ठाकूर, शिबिराचे मुख्य मार्गदर्शक प्रशांत साळुंखे, रायगड विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे, रायगड उपविभागीय अधिकारी विलास जगताप, तसेच मॉडर्न स्कूलच्या प्राचार्या सुमित्रा भोसले उपस्थित होते. रायगड विभागातील विविध शाखांतील मुख्याध्यापक, लेखनिक आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयामध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ प्रयोगशाळेचे उद्‌घाटन चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांना चालना देणाऱ्या या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीस मोठी मदत होईल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यशाळेमध्ये प्रशासनिक कौशल्य, शैक्षणिक नियोजन, शाळा व्यवस्थापन, सहकार्यपूर्ण टीमवर्क, तसेच नवीन शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीसंबंधी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या शैक्षणिक स्वरूपात मुख्याध्यापक आणि लेखनिकांची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी या अभ्यास सत्रांचा मोठा उपयोग होणार आहे.  यावेळी मान्यवरांनी रयत शिक्षण संस्थेची दीर्घकालीन परंपरा, कार्यपद्धती, जबाबदाऱ्या, तसेच भविष्यातील शैक्षणिक योजना यावर प्रकाश टाकला. संस्थेने ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यात मोलाचे योगदान दिले आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.