१३ आणि १४ डिसेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ (इंद्रप्रस्थ) येथे होणार शंखनाद महोत्सव

प्रस्तावना : कधीकाळी “सोन्याची खाण” म्हणून ओळखला जाणारा भारत फक्त संपत्तीमुळे महान नव्हता, तर त्याच्या सनातन संस्कृती, धर्मनिष्ठ जीवनमूल्ये, शौर्य आणि न्यायाधिष्ठित राज्यकारभारामुळे तो विश्वगुरु बनला होता. आज भारत तांत्रिक आणि सामरिक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारतीय सैन्याने आपली ताकद जगासमोर दाखवली आहे; तरीही देशासमोरची आव्हाने कमी झालेली नाहीत. देश जितक्या वेगाने पुढे जात आहे, तितक्याच वेगाने बाह्य आणि आंतरिक शत्रूंची कारस्थानेही वाढत आहेत. अलीकडील दिल्लीतील बॉम्बस्फोटाने राष्ट्राच्या सुरक्षेला आणि एकतेला गंभीर धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा वेळी केवळ दिखाऊ धर्मनिरपेक्षता आणि मतांसाठी होणारे लांगुलचालन देशाला अधिक कमकुवत करेल. त्यामुळे भारताने पुन्हा एकदा विश्वकल्याणासाठी सनातन राष्ट्र म्हणून उभे राहणे हीच आजच्या काळाची खरी गरज आहे !
या उद्देशाने ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’च्या प्रस्तुतीत आणि ‘सनातन संस्था’च्या आयोजनात ‘शंखनाद महोत्सव’ हा भव्य सोहळा १३ आणि १४ डिसेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ (इंद्रप्रस्थ) येथे आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम ‘सनातन संस्था’च्या रौप्यमहोत्सवी वर्षातील एक विशेष पर्व असणार आहे.
ही संधी अधिक महत्त्वाची ठरण्याचे आणखी एक कारण म्हणजे दिल्ली ही फक्त भारताची राजधानी नसून, येथेच राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक निर्णयांची दिशा ठरते. येथून प्रसारित होणारा सनातन संस्कृतीचा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश संपूर्ण देशात प्रभावी प्रतिसाद निर्माण करेल. यामुळे राष्ट्रीय एकता, शौर्य आणि नागरिक चेतना अधिक बळकट होईल. हा महोत्सव धर्मनिष्ठ जीवनमूल्यांचे महत्त्व अधोरेखित करेल आणि अलीकडील दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर समाजाला जागरूकता आणि सामूहिक सुरक्षेचा संदेश देईल.
मुख्य कार्यक्रम आणि प्रदर्शनी : मुख्य कार्यक्रम १३ आणि १४ डिसेंबर रोजी भारत मंडपमच्या प्रमुख सभागृहात होईल. “सनातन संस्कृती संवाद” या परिषदेअंतर्गत सांस्कृतिक, सामाजिक आणि संरक्षणविषयक विविध पैलूंवर चर्चा होईल. “एक्झिबिशन हॉल १२-ए” मध्ये १३ ते १५ डिसेंबरपर्यंत शिवकालीन प्राचीन शस्त्रप्रदर्शनी आणि संस्कृती प्रदर्शनी भरवली जाईल. या प्रदर्शनीत प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांची ‘भवानी तलवार’ प्रत्यक्ष दर्शनासाठी उपलब्ध होईल. पारंपरिक युद्धकलांचे थेट प्रात्यक्षिकही या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असेल.
राष्ट्रप्रेरणेचे स्वर : महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी “विश्वकल्याणकारी सनातन राष्ट्र” या विषयावर विशेष सत्र होईल. यामध्ये नक्षलवाद, दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयांवर तज्ज्ञ विचारमंथन होईल. भारताची संरक्षणनीती, संस्कृतीचे संवर्धन आणि राष्ट्रबळ सुदृढ करण्याचे उपाय यांवर सखोल चर्चा होईल.
‘सनातन राष्ट्र’ स्थापनेचे आवाहन : महाभारत युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी धर्मयुद्धाची घोषणा शंखनादाने केली होती. त्याच दैवी प्रेरणेने सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ईश्वरी अधिष्ठानावर आधारित ‘सनातन राष्ट्र’ स्थापनेचे ध्येय निश्चित केले आहे. दिल्लीतील हा ‘शंखनाद महोत्सव’ धर्मनिष्ठ समाजात आत्मशक्ती जागृत करून नवचैतन्य निर्माण करेल आणि राष्ट्रसेवेसाठी एकत्र येण्याची प्रेरणा देईल.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५ हजार मुठभर मावळ्यांसह हिंदवी स्वराज्य उभं केलं. जेव्हा प्रत्येक सनातनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्य’च्या आदर्शाने आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सनातन राष्ट्राच्या पवित्र संकल्पाने प्रेरित होईल, तेव्हा हा ‘शंखनाद महोत्सव’ फक्त एक कार्यक्रम न राहता, राष्ट्ररक्षण, सामाजिक ऐक्य व संस्कृतीला नवचैतन्य देणाऱ्या नवयुगाची सुरुवात ठरेल.
श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था
(संपर्क : ९९८७९ २२२२२)



Be First to Comment