

खोपोली : प्रतिनिधी
विद्या प्रसारिणी सभा चौक संचलित प्राथमिक विद्यामंदिर व शिशुमंदिर येथे शुक्रवार, दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी वार्षिक क्रीडा महोत्सवाचा भव्य शुभारंभ राष्ट्रीय कुस्तीपटू कु. क्षितिजा जगदीश मरागजे यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करून करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या अध्यक्षा व कार्याध्यक्षा सौ. शोभाताई देशमुख उपस्थित होत्या. कार्यक्रमाला संस्थेचे सेक्रेटरी श्री. योगेंद्र शहा, संचालक श्री. राजेंद्र कापरेकर, सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. गायकवाड, संस्थेचे पर्यवेक्षक व प्राथमिक व शिशुमंदिरचे समन्वयक मा. श्री. देवानंद कांबळे, हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. गुरुनाथ साठेलकर, श्री. मंगेश सावंत, सौ. पूजा मरागजे, प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका तसेच संचालिका सौ. सुलभा गायकवाड यांसह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांनी भव्य संचलन करून प्रमुख पाहुण्या कु. क्षितिजा मरागजे यांना मानवंदना अर्पण केली. यानंतर त्यांच्या हस्ते क्रीडांगणाचे पूजन करून महोत्सवाला सुरुवात देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय समन्वयक श्री. देवानंद कांबळे यांनी करून दिला. हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. गुरुनाथ साठेलकर यांनी विद्यार्थ्यांना संतुलित आहार, मोबाईलचा मर्यादित वापर आणि क्रीडेमुळे होणारे सर्वांगीण लाभ याविषयी मार्गदर्शन करत मोलाचे विचार व्यक्त केले.
प्रमुख पाहुण्या राष्ट्रीय कुस्तीपटू कु. क्षितिजा मरागजे यांनी शालेय पातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या खेळाडू प्रवासातील अनुभव सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
अध्यक्षीय भाषणात सौ. शोभाताई देशमुख यांनी विद्यार्थी वर्गाला प्रोत्साहन देत क्रीडा महोत्सवासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचलन सौ. माधवी यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. अश्विनी वडवले यांनी केले.
यानंतर समन्वयक श्री. देवानंद कांबळे यांनी खेळाडूंना शपथ दिली आणि विविध क्रीडा स्पर्धांना उत्साहपूर्ण सुरुवात झाली. विद्यार्थ्यांचा सहभाग, जोश आणि शिस्तबद्धता यामुळे संपूर्ण परिसर क्रीडामय उत्साहाने भरून गेला.



Be First to Comment