
आत्तापर्यंत तीन नगरसेवक बिनविरोध तर अजूनही काही उमेदवार बिनविरोध होण्याच्या मार्गावर
पेण, ता. १९ (वार्ताहर) : पेण नगरपालिका निवडणुकीत मोठी रंगत पाहवयास मिळत असून तीन नगरसेवक बिनविरोध झाले आहेत तर काही नगरसेवक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहेत.
पेण नगरपालिकेत १२ प्रभागांमध्ये २४ नगरसेवक निवडून जाणार असून एक थेट नगराध्यक्ष निवडून जाणार आहे.मात्र या निवडणुकीला भाजप राष्ट्रवादी महायुती एकत्र तर शिवसेना शिंदे गट वेगळा लढत असून यात शिशीर धारकर यांची आम्ही पेणकर आघाडी आणि संतोष श्रृंगारपुरे यांची नगरविकास आघाडी तर मनसेनेही आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यातच अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग ९ अ- वसुधा तुकाराम पाटील यांच्या विरोधात अर्ज न आल्यामुळे त्या बिनविरोध झाल्या आहेत तर काल झालेल्या छाननीत नगराध्यक्षाचा एक व इतर १७ नगरसेवक उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने राजकीय समीकरणात मोठी उलथापालत होत असल्याचे चिन्ह दिसत असून २१ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत असतानाच दोन दिवस अगोदरच आज ५ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ५ ब- मधून दीपक जयवंत गुरव बिनविरोध निवडून आला आहे तर अभिराज कडू सुद्धा बिनविरोध झाला आहे ? तर अजूनही इतर उमेदवार आपले अर्ज मागे घेण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा शहरात होत असल्याने याबाबत मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असल्याचे दिसत आहे.
दि.२१ रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने यातील काही नगरसेवक बिनविरोध होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पेणची निवडणूक ही रंगतदार होत असताना भाजप राष्ट्रवादी महायुतीच्या थेट नगराध्यक्ष पदाकरिता तिसऱ्यांदा उभ्या असणाऱ्या माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील आणि शिशिर धारकरांच्या आम्ही पेणकर आघाडीच्या माजी नगराध्यक्षा रिया धारकर यांच्यातच खरी लढत पहावयास मिळणार असल्याची चर्चा पेण शहरामध्ये सर्वत्र होत आहे.



Be First to Comment