Press "Enter" to skip to content

कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल, खोपोली येथे विज्ञान-संस्कृती महोत्सव; रायगडाची भव्य प्रतिकृती ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

खोपोली :
कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल, खोपोलीत प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही विज्ञान, भाषा, संस्कृती, इतिहास आणि खेळ यांना समर्पित भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विविध कल्पनाशक्ती, कौशल्य आणि उपक्रमांनी सजलेले हे प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.

यातील विशेष आकर्षण ठरली ती स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती. तब्बल चार फूट उंच आणि वीस फूट लांब असलेली ही दिव्य प्रतिकृती पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करणारी ठरली. रायगडाचे शिल्पवत सौंदर्य जपून तयार केलेली ही भव्य प्रतिकृती साकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. चित्रकला आणि हस्तकलेचे दालन देखील वैविध्यपूर्णरीत्या सजवले होते.

शाळेच्या लोकल मॅनेजर सिस्टर जुली मारिया, मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया, उपमुख्याध्यापिका सिस्टर आयविन यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वांगीण प्रदर्शन उत्साहात पार पडले.

शेकडो विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांत सहभाग नोंदवत आपली प्रतिभा सादर केली. भावी वैज्ञानिक, कलाकार, तंत्रज्ञ, डॉक्टर, अभियंते या माध्यमातून आपली सृजनशीलता प्रभावीपणे मांडताना दिसले. केजी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्वतःची चित्रकला, विविध मॉडेल्स, प्रकल्प, भाषिक प्रयोग, सांस्कृतिक सादरीकरण आणि क्रीडा संकल्पना सादर करून वातावरण ज्ञानमय केले.

विद्यार्थ्यांनी खेळांच्या विविध साहसी प्रकार, तसेच खाण्यापिण्याचे स्टॉल देखील आकर्षक पद्धतीने उभारले होते. प्रदर्शनाला पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने भेट दिली.

विशेष म्हणजे, समाजिक बांधिलकी जपत प्रदर्शनादरम्यान शिक्षकवर्ग व पालकांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले.

सर्व क्षेत्रांचा सुंदर संगम असलेल्या या प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळवून देत कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलची उपक्रमशीलता अधोरेखित केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.