
पेण भाजप राष्ट्रवादी महायुती कडून शक्ती प्रदर्शन ; नगराध्यक्षा पदाकरिता प्रीतम ललित पाटील या तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात
पेण, ता. १७ (वार्ताहर) : पेण नगरपालिका निवडणुकीत आज शेवटच्या दिवशी अनेकांकडून उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यात भाजपा राष्ट्रवादी महायुतीने शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.यामध्ये नगराध्यक्षा पदाकरिता प्रीतम ललित पाटील या तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.
पेण नगरपालिका निवडणुकीत एकुण १२ प्रभागात २४ नगरसेवक व थेट नगराध्यक्ष असे २५ सदस्य बसणार असून आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक दिग्गजांचे अर्ज दाखल झाले आहेत.त्यातच शहराच्या कोलटकर वाडा येथील गणपती मंदिरात खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवीशेठ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दयानंद भगत याच्या भाजप राष्ट्रवादी महायुतीतून श्रीफळ वाढवून शक्ती प्रदर्शन करत ढोल ताशांच्या गजरात नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवक पदांचे उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी बोलताना खासदार धैर्यशील पाटील म्हणाले की अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड संख्येने आलेला मतदार राजा पाहता विजय महायुतीचा पक्का आहे.काही जे नाराज होते ते पक्ष सोडून गेले आहेत त्यांच्यावर पक्ष कारवाई करण्यात येईल.तर गेल्या दहा वर्षात पेणमध्ये केलेल्या विकासात्मक कामामुळे जनता आमच्या बरोबर आहे पेणची जनता ही सुज्ञ आहे.त्यामुळे या निवडणुकीतही नगराध्यक्षासह २४ नगरसेवक निवडून येणार असल्याचे आमदार रवीशेठ पाटील यांनी सांगितले.



Be First to Comment