
किल्ले सांकशी (पेण) येथे ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम उत्साहात संपन्न !
पेण– इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रभावनेची जपणूक हा उद्देश ठेऊन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडसंवर्धन मोहीम किल्ले सांकशी (ता. पेण) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या मोहिमेत ८० हून अधिक युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
हिंदु जनजागृती समितीचे श्री.सुनील कदम यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी केलेल्या महान कार्यातून राष्ट्र आणि धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळावी तसेच गडांचे ऐतिहासिक महत्त्व आणि संवर्धन याबद्दल जनजागृती व्हावी हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. गड-किल्ले मोहिमेत सहभागी झाल्यावर आपली क्षमता कळते तसेच ती वाढवण्याची प्रेरणाही मिळते. आपले दैनंदिन जीवन आदर्श घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन कृती करूया’.



या मोहिमेत सांकशी किल्ल्यावरती साफसफाई, प्लास्टिक व कचरा गोळा करण्यात आला. तसेच युवकांमध्ये आत्मविश्वास आणि स्वतःचे रक्षण करण्याची मानसिकता निर्माण व्हावी यासाठी गडाच्या पायथ्याशी कराटे, लाठीकाठी, दंडसाखळी यांचे प्रशिक्षण आणि स्वरक्षा प्रात्यक्षिके घेण्यात आली. या प्रशिक्षणाद्वारे तरुणांनी स्वतःचे आणि राष्ट्राचे संरक्षण करणे हा संदेश देण्यात आला. सहभागी सर्व युवक-युवतींनी या मोहिमेतून प्रेरणा मिळाली तसेच पुढेही अशा मोहिमांत सहभाग घेऊन राष्ट्र आणि धर्मकार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.



Be First to Comment