
पनवेल (प्रतिनिधी) रायगड वॉरियर्स आयोजित, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्या सहकार्याने आणि ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड पुरस्कृत रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा पाचव्या सत्रातील अंतिम फेरीचे सामने रविवारी खेळविण्यात आले. या स्पर्धेत तीन वेगवेगळ्या चषकांसाठी अंतिम लढती झाल्या. त्यामध्ये रेवल विनर्स, प्राईम दादा इलेव्हन आणि बाश्री ब्लास्टर्स या संघांनी विजेतेपद पटकावले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी संपन्न झाला असून त्यांनी यावेळी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आणि पनवेलमधील इतर खेळाडूंसाठी अशा स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात असे प्रतिपादन केले.

रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील पहिला आणि अत्यंत चुरशीचा रौप्य चषकाचा अंतिम सामना आर आर फायटर्स विरुद्ध रेवल विनर्स यांच्यात खेळवण्यात आला. आर आर फायटर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १३ षटकांत ६ गडी गमावून १२२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, रेवल विनर्सने १३ षटकांत ५ गडी राखून १२३ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. या सामन्याचे रौप्य चषक वितरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. सुवर्ण चषकासाठी दुसरा अंतिम सामना प्राईम दादा इलेव्हन आणि पिंपरी एलीट इगल्स यांच्यात झाला. पिंपरी एलीट इगल्सने १४ षटकांत ६ गडी गमावून ११७धावा केल्या. प्राईम दादा इलेव्हन संघाने हे लक्ष्य केवळ १२.२ षटकांत २ गडी गमावून १२३ धावा करत पूर्ण करत सुवर्ण चषकावर आपले नाव कोरले. तिसरा अंतिम सामना प्लॅटिनम चषकासाठी बाश्री ब्लास्टर्स विरुद्ध बीकेसी यांच्यात झाला. बीकेसी संघाने १५ षटकांत ७ गडी गमावून ११७ धावा केल्या. बाश्री व्लास्टर्सने १४.३ षटकांत ५ बाद ११२ धावा करून ५ धावांनी लक्ष्य गाठत बाश्री ब्लास्टर्सने प्लॅटिनम चषक जिंकला.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, नविन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पनवेल शहर भाजप अध्यक्ष सुमित झुंझारराव, पनवेल उतत मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे अध्यक्ष अनिल ठकेकर, रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी चे अध्यक्ष डॉ. रोहित जाधव, भारत विकास परिषद चे अध्यक्ष कमांडर जांभेकर, रोटरी प्रांत ३१३१ चे माजी स्पोर्ट्स संचालक संतोष घोडिंदे, तसेच रायगड वॉरियर्सचे पदाधिकारी, सर्व टीमचे मालक, खेळाडू आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सर्व महापालिका अधिकारी, स्पर्धा आयोजक, मैदानावरील कर्मचारी आणि सर्व सहभागी खेळाडूंचे आभार मानून स्पर्धेची सांगता केली.



Be First to Comment