
‘बालकांचे हक्क’ या विषयावर ‘थोडा पॉज’ या पथनाट्याचे सादरीकरण
तृप्ती भोईर : बेलापूर
बालदिनाच्या निमित्ताने दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी कौटुंबिक न्यायालय, बेलापूर येथे समाजप्रबोधनासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. कौटुंबिक न्यायालय, बेलापूर, तालुका विधी सेवा समिती, बेलापूर, नवी मुंबई वकील संघटना आणि टिळक महाराष्ट्र विधी विद्यालय, खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बालकांचे हक्क’ या विषयावर ‘थोडा पॉज’ या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
या उपक्रमाची संकल्पना कौटुंबिक न्यायालयाचे माननीय न्यायाधीश सुभाष काफरे यांची होती. नवरा–बायकोच्या कौटुंबिक वादांचा निर्दोष मुलांवर होणारा मानसिक परिणाम, तसेच अनेकदा मुलांचा वादात ‘हत्यार’ म्हणून होणारा गैरवापर या गंभीर सामाजिक विषयावर प्रकाश टाकणारे हे पथनाट्य टिळक विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. प्राध्यापिका वर्षा बडवे आणि सहायक प्राध्यापिका प्राजक्ता बालवीर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या नाट्यातून कौटुंबिक सौहार्दाचे महत्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले.
दांपत्यातील सततच्या भांडणांमुळे मुलांच्या मनावर ताण, भीती, अभ्यासात ढासळणारी एकाग्रता आणि आत्मविश्वास कमी होण्याची समस्या वाढत आहे. अशा परिस्थितीत पालकांनी घटस्फोटाचा निर्णय घेण्यापूर्वी मुलांच्या भविष्यासाठी एकदा तरी विचार करावा, हा मोलाचा संदेश पथनाट्याद्वारे समाजास देण्यात आला.या कार्यक्रमात नवी मुंबई वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. सुनिल मोकल, उपाध्यक्ष ॲड. संदीप रामकर, सचिव ॲड. विकास म्हात्रे आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या वतीने पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. नाझनीन शेख यांनी केले.कार्यक्रमाला कौटुंबिक न्यायालयाचे विवाह समुपदेशक भारत काळे, प्रबंधक जी. एस. हिरवे, सहायक अधिक्षक राजेश म्हात्रे, लघुलेखक विजय पोटे आणि कुलदीप जाधव, वरिष्ठ लिपिक के. पी. किर्वे, कनिष्ठ लिपिक निलम भोसले, अक्षता कोळसुंदकर, सहाय्यक राज निकम, प्रीती नन्नावरे, तसेच पोलीस कर्मचारी सुनिछ बातेरे आणि पल्लवी देशमुख यांच्यासह वकील, पक्षकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकंदरीत, ‘थोडा पॉज’ या पथनाट्याने समाजाला कौटुंबिक मूल्यांचा आणि मुलांच्या मानसिक आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला.




Be First to Comment