
आमदार प्रशांत ठाकूर यांची तहसीलदारांकडे उपाययोजनेची मागणी
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील नितळस गाव परिसरात अलिकडच्या काही दिवसांत बिबट्याच्या हालचाली, त्यांच्या उपस्थितीची चिन्हे आणि संचारकाळातील दृश्ये समोर आली आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त पाहणी व स्थळभेट आयोजित करून या विषयावर प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे की, नितळस गाव परिसरात नागरिकांची सुरक्षितता, जंगल क्षेत्रातील नियंत्रण तसेच बिबट्याला विनाव्यत्यय सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या अनुषंगाने वन विभाग, महापालिका व पोलीस विभाग यांच्यात समन्वय होणे आणि प्रत्यक्षस्थळी संयुक्त पाहणी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपण संबंधित वन विभाग अधिकारी पोलीस अधिकारी व स्थानिक प्रशासनासोबत प्रत्यक्षस्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती मार्गदर्शक सूचना देऊन योग्य ती उपाययोजना तातडीने राबवावी, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनात म्हटले आहे. बिबट्याचा वावर लक्षात घेता परिसरात रात्रीच्या वेळी गस्त वाढविणे, नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणे, आवश्यक तेथे पिंजरे व तांत्रिक साधनांची उपलब्धता तसेच हेल्पलाइन व सूचना प्रणाली मजबूत करणे आवश्यक असल्याचेही तहसीलदार मिनल भामरे यांना दिलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.




Be First to Comment