
२४० खेळाडूंचा सहभाग — कोल्हापूर विभाग सांघिक विजेता, पुणे विभाग उपविजेता
खोपोली :
खोपोलीतील काशी स्पोर्ट्स सेंटर येथे नुकतीच १७ वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा जल्लोषात पार पडली. राज्यभरातील तब्बल २४० मुलामुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. फ्रीस्टाईल आणि ग्रेको-रोमन पद्धतीच्या विविध वजनी गटांत सामने रंगले.
या भव्य स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी काशी स्पोर्ट्सचे अध्यक्ष विक्रम साबळे, डॉ. समर्थ मनुकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर, तसेच रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ आणि राज्य क्रीडा मार्गदर्शक निळकंठ आखाडे प्रमुख उपस्थित होते.
कुस्ती क्रीडाप्रकाराला अधिक चालना देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन श्री. परेश ठाकूर यांनी दिले. त्यांनी सांगितले की, “खोपोली परिसरात कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. यामुळे नवोदित खेळाडूंना व्यासपीठ व प्रोत्साहन मिळेल.”

स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यास आणि काशी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. स्पर्धा प्रमुख राजाराम कुंभार, निरीक्षक संदीप वांजळे व दत्ता माने, तसेच तांत्रिक प्रमुख जगदीश मरागजे यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात मोलाचा वाटा उचलला.
कार्यक्रमास टाटा स्टील कंपनीचे शशी भूषण, भावेश रावळ, सौरभ शर्मा, तसेच रिन्युसेस कंपनीचे चंद्रकांत मोडक आणि निलेश साळुंखे उपस्थित होते.
कोल्हापूर विभागाच्या मुलींनी ६ सुवर्ण, १ रौप्य, २ कांस्य पदके मिळवत सांघिक विजेतेपद पटकावले, तर मुलांनी ६ सुवर्ण, ३ रौप्य, ७ कांस्य पदकांसह वर्चस्व गाजवले. पुणे विभागाच्या मुलींनी ३ सुवर्ण, ४ रौप्य, १ कांस्य, आणि मुलांनी ४ सुवर्ण, ४ रौप्य, ६ कांस्य पदकांसह सांघिक उपविजेतेपद मिळवले.
स्पर्धेच्या आयोजनात कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यास व काशी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या सर्व सदस्यांनी उत्कृष्ट नियोजन केले. हेल्प फाउंडेशनने उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्था पुरवली, तसेच खेळाडूंसाठी सुसज्ज निवास आणि पौष्टिक भोजनाची उत्तम सोय करण्यात आली. प्रेक्षकांसाठी आकर्षक आसनव्यवस्था, एलईडी स्क्रीनद्वारे थेट प्रक्षेपण आणि यू ट्यूब वर लाईव्ह स्ट्रीमिंगची सुविधाही देण्यात आली.
स्पर्धा आयोजन समितीच्या वतीने कुस्ती क्रीडाप्रकारात आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करणाऱ्या प्रशिक्षकांचा “महाराष्ट्राचे द्रोणाचार्य” असा विशेष सन्मान करण्यात आला.या मानकरी प्रशिक्षकांमध्ये दादा लवटे, संदीप पाटील, संदीप पठारे, अमोल यादव, नागेश राक्षे, किरण मोरे, संपती येळकर, विजय चव्हाण आणि दिवेश पालांडे यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काशी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यास, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ, सर्व पंच, प्रशिक्षक, आयोजक तसेच रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ आणि राज्य क्रीडा मार्गदर्शक निळकंठ आखाडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य अत्यंत मोलाचे ठरले.




Be First to Comment