

रायगड जिल्ह्यातील एसटीच्या समस्या तात्काळ सोडवा शिवसेना, मनसेचे निवेदन
पेण, (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या प्रवासाकरिता गेल्या काही महिन्यांपासून विविध समस्या प्रवासी वर्गाला भेडसावत असल्याने या तात्काळ सोडवाव्यात याकरिता ठाकरे गट शिवसेना, मनसे तसेच रायगड एसटी प्रेमी संघटनांनी रायगड विभाग नियंत्रक डॉ.सुहास चौरे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले.
यावेळी झालेल्या चर्चेअंती जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या नियोजनात अनेक प्रकारच्या समस्या असून त्या विभाग नियंत्रकांकडे मांडण्यात येत असताना यामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात असणाऱ्या त्रुटी, राज्यातील तीर्थक्षेत्रासाठी सुटणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ, गाडीमध्ये सीएनजी भरताना होणारा विलंब गाडीतील प्रवाशांना होणारा त्रास, ग्रामीण भागात अंदाधुंद पद्धतीने गाड्या चालविणाऱ्यांवर कारवाईची मागणी, वेळेवर गाड्यांची दुरुस्ती आदि मागण्यांबाबत विचारणा केली असता या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन त्या लवकरात लवकर अमलात कशा येतील याबाबत पेण, अलिबाग, मुरुड, कर्जत यासह तरही डेपो मॅनेजर यांच्याशी संपर्क साधून प्रवासी वर्गाला सुखकर, चांगली आणि योग्य सुविधा तसेच वेगावर नियंत्रण याबाबतच्या सूचना देण्यात येतील असे आश्वासन रायगड विभाग नियंत्रक डॉ. सुहास चौरे दिले आहे.तर यावेळी जिल्ह्यात एनएमएमटी बसेस सुरू करावे अशी मागणी जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी केली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे, भगवान पाटील, योगेश पाटील, चेतन मोकल, तुकाराम म्हात्रे, दिपक पाटील, संजय भाय, मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर, उपाध्यक्ष शैलेश खरात, मुरुड सचिव राजेश तरे, अलिबाग तालुका प्रमुख सिद्धू म्हात्रे, एसटी प्रेमी संघटनेचे योगेश पाटील, अनिल कंटक, समीर रांजणकर, स्वप्नील भगत आदी उपस्थित होते.




Be First to Comment