Press "Enter" to skip to content

‘वंदे मातरम’ गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त नविन पनवेलमध्ये भव्य समूहगायन कार्यक्रम  

राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती;  शरद पोंक्षे करणार ‘वंदे मातरम’ च्या इतिहासावर मार्गदर्शन 

 राष्ट्रीय एकात्मतेचा जयघोष – नविन पनवेलमध्ये ‘वंदे मातरम’ १५० वर्षांचा सोहळा

पनवेल (प्रतिनिधी) स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व शहिदांना वंदन आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार येत असून त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०४ वाजता नविन पनवेल मधील के. ए. बांठिया विद्यालय येथे ‘वंदे मातरम’ समूह गायन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आल्याची माहिती कार्यक्रम प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अभिनेते व राष्ट्रविचाराचे प्रसिद्ध व्याख्याते शरद पोंक्षे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितीत राहून वंदे मातरम गीताची पार्श्वभूमी व महत्व यावर मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

         मार्केट यार्ड येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला त्यांच्या समवेत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजपचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नविन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, यतीन पाटील आदी उपस्थित होते. 

        आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती देताना पुढे सांगितले कि, भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने वंदे मातरम गीताच्या १५० वर्षांच्या उल्लेखनीय परंपरेचा उत्सव राष्ट्रीयस्तरावर साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कार्यकर्ते आणि लोकसहभागातून हा उत्सव व्यापक प्रमाणात साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने भाजपा देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामूहिक वंदे मातरम गायन, देशभक्तीपर रॅली तसेच जनजागृती उपक्रमांचे आयोजन करणार आहे. हे सर्व कार्यक्रम आगामी संविधान दिन (२६ नोव्हेंबर) पर्यंत सतत चालणार आहेत. देशभरात १५० ठिकाणी कायर्क्रम तर महाराष्ट्रात नागपूर, अकोला, ठाणे, रायगड, पुणे, अहिल्यानगर, कराड सातारा, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर या १० ठिकाणी होणार असून रायगड जिल्ह्याचा कार्यक्रम ०७ नोव्हेंबरला नविन पनवेल येथे होणार आहे. 

       ‘वंदे मातरम’ हे गीत भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील राष्ट्रप्रेम, ऐक्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या लढ्यात या गीताने असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा दिली. हे गीत केवळ शब्दांची अभिव्यक्ती नसून, भारतीय जनतेच्या भावविश्वाचे, स्वातंत्र्याच्या उत्कटतेचे आणि मातृभूमीवरील प्रेमाचे प्रतीक आहे.  वंदे मातरमच्या इतिहासाची आणि राष्ट्रवादाच्या प्रेरणेची जनसामान्यांना माहिती करुन देणे, युवकांमध्ये देशभक्तीची भावना दृढ करणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचा प्रचार  व प्रसार आणि त्या अनुषंगाने राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याला बळकटी देणे हे या कार्यक्रमांचे प्रमुख उद्देश आहे. त्यानुसार बांठिया विद्यालय येथे होणाऱ्या या कार्यक्रमात विविध विद्यालयांचे अडीच हजारांहून अधिक विद्यार्थी, विविध संस्था, संघटना, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असून नागरिकांनीही या महत्वपूर्ण उत्सवात सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.